परभणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात विविध कार्यक्रम पार पडले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व काळजी घेत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपूडकर, आ. मेघनाताई बोर्डीकर, महापौर अनिताताई सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी सिद्धार्थ हत्तीअंबिरे, भाजपाचे महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम पार पडले. रक्तदान शिबिरांसह प्रबोधनाच्या कार्यक्रमांचाही यात समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, याची काळजी घेत शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय बौद्ध महासभेेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष विश्वनाथ झोडपे यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. समता सैनिक दलाच्या वतीने अशोक कांबळे, डी. के. टोम्पे, एन.जी. गोधम यांनी सलामी दिली. याप्रसंगी महापौर अनिताताई सोनकांबळे, बाबासाहेब धबाले, इंजि. भरणे, व्ही. व्ही. वाघमारे, प्रा. सिरसाठ, ज्ञानोबा खरात, सुनील काेकरे, रवि पुंडगे आदींची उपस्थिती होती.