परभणी : विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीनुसार त्या त्या शाळेतील संचमान्यता दिली जाण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संचालकांनी घेतला आहे. त्यामुळे रखडलेले आधार नोंदणीचे अद्ययावतीकरणाचे काम आता शाळांना करावे लागणार आहे.
पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्याचे निर्देश २०१५ मध्ये शिक्षण विभागाने दिले होते. मात्र मध्यंतरी कोरोनाच्या संकटामुळे हे काम रखडले होते. तसेच सध्या शाळा बंद असल्याने अनेक शाळांचे आधार नोंदणीचे काम अर्धवट झाले आहे. मात्र आता विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीनुसार संचमान्यता दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक डी.जी. जगताप यांनी स्पष्ट केले असून, तसे पत्र सर्व शाळांना पाठविले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आधार नोंदणीच्या आधारेच संचमान्यता दिली जाणार आहे. त्यामुळे केवळ आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरली जाणार असून, त्यानुसार संचमान्यता दिली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होऊ शकतात. तेव्हा प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.