परभणी : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विषयी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेली नाराजी अद्यापही कायम असून, मुंबई येथे यासंदर्भात गुरुवारी बैठक होणार असल्याची चर्चा आहे.
पालकमंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांना वेळ देत नाहीत, त्यांची कामे करीत नाहीत, अशी ओरड गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या नेतेमंडळींकडून केली जात होती. त्यानंतर पालकमंत्री बदलाची मागणीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे, माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर आदींनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी पालकमंत्री मलिक यांना परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांमधील मतभेद मिटल्याचे वातावरण दिसून येत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास पालकमंत्री परभणीत आले असता, पक्षाच्या वतीने आयोजित अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे अंतर्गत मतभेद मिटले असे वाटत असतानाच पुन्हा पालकमंत्र्यांविषयी पदाधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे समजते. १५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हा नियोजन समिती निधी वितरणाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी पुन्हा अजित पवार यांच्याकडे पालकमंत्र्यांची तक्रार केली असल्याचे समजते. या तक्रारीवरून चर्चेसाठी अजित पवार यांनी आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. विजय भांबळे व माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांना १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत चर्चेसाठी बोलावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या बैठकीत काय चर्चा होते, पालकमंत्र्यांमध्ये बदल होतो की पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होतेे, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
जयंत पाटील जिल्हा दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेअंतर्गत २३ फेब्रुवारी रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी दुपारी ३.३० वाजता ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जाणार असल्याचे समजते.