गंगाखेड: गुटख्याची तस्करीकरून परळीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या जीपने एका खाजगी बसला जोराची धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता वंदन पाटी जवळ घडली. या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाला. पोलीस तपासात जीपमधून गुटख्याने भरलेल्या गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी तीन लाख रुपयांचा गुटखा आणि जीप जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान गंगाखेड येथून एक जीप ( एम एच १३ एजे ४४४४ ) भरधाव वेगाने परळीकडे जात होती. वंदन पाटीजवळ या जीपने समोर येणाऱ्या खाजगी बसला ( यु पी ८१ सीटि ३७७६ ) जोराची धडक दिली. अपघाताची माहिती समजताच सोनपेठ येथून गंगाखेडकडे येत असलेल्या दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, जमादार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, पोलीस नाईक यशवंत वाघमारे, राहुल चिंचाणे, शंकर गायकवाड आदींसह गंगाखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश राठोड, सपोनि. बालाजी गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक टी. टी. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी जीप चालक शिवम दिगंबर निरस ( रा. पडेगाव ता. गंगाखेड ) पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पायाला मार लागून गंभीर जखमी झालेल्या शिवम निरस याच्यावर प्रथमोपचार करून नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
जीपमध्ये आढळला गुटखा खाजगी बसचा चालक बालासाहेब रामभाऊ मुळे ( ३०, रा. महातपुरी ता. गंगाखेड ) यांच्या फिर्यादीवरून जीप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जीपची तपासणी केल्या असता त्यातील २८ गोण्यात ३ लाख रुपयाचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी पुढील तपास सपोनि राजेश राठोड हे करीत आहेत.