पाथरी : शहरातील एका घरावर टाकलेल्या धाडीत साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी शहरातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी परभणीहून जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या आदेशानुसार पोलिसांचे एक पथक पाथरी येथे आले होते. या पथकाला अवैध गुटख्याचा साठा केल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून या विशेष पथकाने शहरातील मुर्तुजा कॉलनीतील नासेर ऊर्फ पप्पू बाबू भाई अन्सारी यांच्या राहत्या घरात गुटखा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर या पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता छापा टाकला. या छाप्यामध्ये घरातील एका खोलीमध्ये प्रतिबंधित केलेला ४ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यामध्ये २० गोण्या असून, एक मोबाईल असा मुद्देमाल आहे. याप्रकरणी ३ आरोपींविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहुल चिंचाणे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, विष्णू भिसे, दीपक मुदिराज यांचा समावेश होता.