परभणी : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील ५८ हजार १६६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे.
जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा प्राथमिक पाहणी अहवाल महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी ग्रामीण पातळीवरुन मागविला होता. त्यानुसार हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पाथरी या एकमेव तालुक्यास पावसाचा फटका बसला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक फटका पालम तालुक्याला बसला असून त्या खालोखाल गंगाखेड तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. महसूलच्या प्राथमिक अहवालानुसार पालम तालुक्यात या तीन दिवसात १४.६६ मि.मी. पाऊस झाला. त्यामध्ये २५ हजार ५५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात १८ हजार ९९ हेक्टर जिरायत पिकांचा समावेश असून ७ हजार ७५ हेक्टर वरील बागायती पिकांचा समावेश आहे. ३७६ हेक्टर वरील फळबागांचे नुकसान झाले आहे.
गंगाखेड तालुक्यात १७ हजार २२८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यामध्ये १२ हजार ६० हेक्टर जिरायती जमिनीवरील तर ३ हजार ४४६ हेक्टर बागायती जमिनीवरील आणि १ हजार ७२२ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पूर्णा तालुक्यात एकूण १० हजार १२७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात ६ हजार ५७७ हेक्टर जिरायत जमिनीवरील तर २ हजार ८०० हेक्टर जमिनीवरील बागायती आणि ७५० हेक्टर जमिनीवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे. या शिवाय सोनपेठ तालुक्यात १ हजार ९६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात १३०९ हेक्टर जिरायत जमिनीवरील तर ४४३ हेक्टर बागायत आणि १७४ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे. सेलू तालुक्यातील एकूण २ हजार ७०० हेक्टर जमिनीवरील पिकांचे गारपिटीने नुकसान झाले आहे. त्यात १६०० हेक्टर जिरायती, १००५ बागायती तर ९५ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे. परभणी तालुक्यात ४५५ हेक्टर जिरायती जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिंतूर व मानवत तालुक्यातही प्रत्येकी ७० हेक्टर जिरायती जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचेही या अहवालात नमूद केले आहे. हा प्राथमिक अहवाल असून ग्रामसेवक व महसूलच्या कर्मचार्यांकडून सद्यस्थितीत पंचनामे सुरु आहेत. त्यानंतर अंतिम अहवाल जाहीर होणार आहे.
मदतीसाठी ५० कोटींचा निधी लागणारराज्य शासनाने गारपीटग्रस्तांसाठी गुरुवारी तोकडी मदत जाहीर केली आहे. या मदतीने शेतकर्यांचे नुकसान भरुन निघणार नाही, हे निश्चित आहे. असे असले तरी शासनाने जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये मदत जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४० हजार २४० हेक्टर जिरायती जमिनीवरील शेतकर्यांच्या मदतीकरीता २७ कोटी ३६ लाख ३३ हजार रुपयांच्या मदतीची गरज आहे. शासनाने बागायती पिकांसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० रुपये मदत जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १४ हजार ८०९ हेक्टर बागायती जमिनीवरील पिकांच्या नुकसानीच्या मोबदल्यापोटी १९ कोटी ९९ लाख २१ हजार ५०० रुपयांची मदत लागणार आहे. याशिवाय शासनाने फळ पिकांसाठीही पिकांच्या श्रेणीनुसार मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये मोसंबी व संत्रा पिकांसाठी प्रति हेक्टरी २३ हजार ३०० रुपये, केळीसाठी ४० हजार रुपये, अंब्यासाठी प्रति हेक्टरी ३६ हजार ६०० रुपये आणि लिंबू पिकासाठी प्रति हेक्टरी २० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात ३ हजार ११७ हेक्टर जमिनीवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे.
गारपिटीत १ ठार; १४ जखमीतीन दिवसांतील गारपिटीत पूर्णा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर ठिकाणी १४ जण जखमी झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जखमींमध्ये सर्वाधिक म्हणजे ११ जण पूर्णा तालुक्यातील आहेत. तर पालम तालुक्यातील तिघांचाही त्यात समावेश आहे.
सेलूत सर्वाधिक पाऊस११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान सेलू तालुक्यात १६.४० मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पालम १४.६६ मि.मी. तर गंगाखेड तालुक्यात १३ मि. मी. पाऊस झाला. जिंतूरमध्ये ४.८३, मानवत मध्ये ४.३३, पूर्णेत ५.४० मि.मी. पाऊस झाला.
५५ हजार हेक्टरवरील क्षेत्र ३३ टक्केपेक्षा जास्त बाधिततीन दिवसांत झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील एकूण ५८ हजार १६६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असले तरी त्यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र ५८ हजार ४८० हेक्टर जमिनीवरील आहे. त्यात २५ हजार ५५० हेक्टर क्षेत्र हे एकट्या पालम तालुक्याचे आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यातील १७ हजार २२८, पूर्णा तालुक्यातील १० हजार १२७ हेक्टरवरील क्षेत्र हे ३३ टक्क्यापेक्षा जास्त बाधित झाले आहे.