परभणी : रविवारी रात्री जिल्ह्याला प्राप्त झालेल्या २० हजार डोसेसमधून सोमवारी दिवसभरात १० हजार ८५५ नागरिकांना लसीकरण झाले असून, निम्मी लस पहिल्याच दिवशी संपली आहे. मंगळवारी देखील लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने बुधवारी लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज रुग्ण वाढत असल्याने आता नागरिकांनी लसीकरणावर भर दिला आहे. मात्र, जिल्ह्याला लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रशासनासमोर आव्हाने उभी ठाकली आहेत. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. रविवारी रात्री जिल्ह्यासाठी कोव्हिशिल्ड लसीचे २० हजार डोस प्राप्त झाले होते. त्यामुळे सोमवारी सकाळपासून सर्वच लसीकरण केंद्रांवर गर्दी झाली. नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी घराबाहेर पडत असून, सोमवारी दिवसभरात १० हजार ८५५ नागरिकांनी लस घेतली आहे. २० हजार डोसेसमध्ये निम्मे डोस सोमवारीच संपले होते. त्यानंतर उर्वरित डोसेसमधून मंगळवारी देखील लसीकरण करण्यात आले. लस घेण्यासाठी सर्वच केंद्रांवर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळे मंगळवारी शिल्लक राहिलेला लसीचा साठाही संपेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आज, बुधवारी लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यासाठी आता प्रशासनाकडे लस उपलब्ध राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प होण्याची शक्यता आहे.
रांगा लावून लसीकरण
परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत मंगळवारी आठ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या सर्वच केंद्रांवर सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत केंद्रांवर गर्दी पाहावयास मिळाली. ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लसीकरणासाठी ग्रामस्थांनी रांगा लावल्या आहेत.
एक लाख ४६ हजार लसीकरण पूर्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४६ हजार ३८३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात ६४ हजार ३६६ महिला आणि ८२ हजार १७ पुरुषांनी लस घेतली आहे. ४५ वर्षांपुढील १ लाख ११ हजार २३४ नागरिकांना लसीकरण झाले. तसेच कोरोना योद्धा असलेल्या २१ हजार ३२३ कर्मचाऱ्यांनी आणि आरोग्य विभागातील १३ हजार ५८९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे
सोमवारी असे झाले लसीकरण
आरोग्य विभागातील कर्मचारी : १२३
कोरोना योद्धे कर्मचारी ९३२
पंचेचाळीस वर्षांपुढील नागरिक ९८००
७८८८
नागरिकांनी घेतला पहिला डोस
२९६७
नागरिकांनी घेतला दुसरा डोस