सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे. यातच डिजीटल जमान्यात मोबाईलमध्ये बँकेचे सर्व व्यवहार करण्यासाठीचे अँप्लिकेशन उपलब्ध आहेत. यामुळे बँकेत जाण्याचे काम फार क्वचितच उरले आहे. मात्र, यातही बँकेच्या नावाखाली खोटे एसएमएस तयार करुन त्याद्वारे एकाद्याची सर्व माहिती गोळा करुन ऑनलाईन फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. याचे प्रमाण जिल्ह्यातही आहे. मात्र, तक्रार अर्ज देऊन नागरिक मोकळे होतात. यात गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे गुन्हेगार नवनवीन पर्याय शोधून फसवणूक करीत आहेत.
अशी होऊ शकते फसवणूक
एटीएम कार्ड ब्लाँकच्या नावाखाली फसवणूक
- एटीएम कार्ड ब्लाँक झाले आहे, नवीन पाहिजे असल्यास किंवा हे कार्ड बंद करण्यासाठी आलेल्या लिंकमध्ये माहिती भरा असे सांगून सध्या फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.
क्रेडिट कार्डची रक्कम वाढली
तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असो किंवा नसो आणि तुम्ही त्यासाठी अर्ज केलेला नसेल तरीही तुमची क्रेडीट कार्डची रक्कम अमूक हजारांनी वाढली आहे. यासाठी लिंकमध्ये माहिती भरा, असा आलेला एसएमएस तुमचे बँक खाते रिकामे करु शकतो.
केवायसीच्या नावाखाली फसवणूक
बँकेत असलेले खाते केवायसी करणे बाकी आहे. यासाठी आधार कार्ड, पँन कार्ड यांची माहिती भरा असे सांगून बँक खात्याला जोडलेल्या नंबरवरील आलेला ओटीपी द्या, असा फसवणूकीचा प्रकार सध्या सर्वाधिक प्रमाणात होत आहे. यातून केवायसीच्या नावाखाली रक्कम काढून घेतली जात आहे.
अनोळखी अँप्लिकेशन इन्स्टाँल करणे टाळा
आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही अँप्लिकेशन घेताना अँलो अँप्लिकेशन करताना मोबाईलमधील वैयक्तिक माहिती फसवणूक करणाऱ्याच्या हाती पडू शकते. यातून तुमच्या मोबाईलवर बँकेत पैसे जमा करण्यासाठी यावर क्लिक करा, अशा लिंकपासून धोका होऊ शकतो. यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
४८ तासात तक्रार करणे गरजेचे
ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झालेले पैसे परत मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीला त्याच्या बँकेत किंवा आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर याची तक्रार करता येते. तसेच पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करता येतो. यासाठी फसवणूक झाल्यानंतर ४८ तासात तक्रार करणे गरजेचे आहे. यानंतर मात्र, पैसे मिळणे अवघड आहे.
परभणी जिल्ह्यात प्रकार वाढले
जिल्ह्यात केवायसी तसेच ऑनलाईन फसवणूकीच्या माध्यमातून खात्यातील पैसे गायब करण्याचे प्रकार वाढले आहेत. अगदी २ हजारांपासून ते २ लाखापर्यंत रक्कम चोरीला गेली आहे. मात्र, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.