परभणी : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने पत्राच्या खाली असलेल्या लाकडी अडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १७ एप्रिलला पाथरी तालुक्यातील वरखेड येथे दुपारी घडली आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द मंगळवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उर्मिला विष्णू तोंडे (२१) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत अरुण नानाभाऊ चौरे यांनी पाथरी ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्यात नमूद केले की, त्यांची मुलगी उर्मिला विष्णू तोंडे हिला सासरच्या लोकांनी तुला स्वयंपाक येत नाही, घरातील काम येत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही, या कारणावरून नेहमी बोलून त्रास दिला. तसेच शेत घेण्यासाठी वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये अन्यथा तुला नांदवणार नाही, असे म्हणून सतत त्रास दिला. या सततच्या होणाऱ्या सासरच्या त्रासाला कंटाळून उर्मिला विष्णू तोंडे या विवाहितेने सोमवारी दुपारी दीड वाजण्यापूर्वी वरखेड येथील केदार वस्ती भागातील घरामध्ये पत्राच्या खाली असलेल्या लाकडी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली.
तिघांविरुध्द गुन्हा, एक जण ताब्यातपाथरी ठाण्यात आरोपी विष्णू बिभीषण तोंडे, चंद्रकला बिभीषण तोंडे, बिभीषण रायभान तोंडे (सर्व रा.केदार वस्ती, वरखेड, ता. पाथरी) यांच्याविरुद्ध अरुण चौरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुरणर करीत आहेत. यातील आरोपी विष्णू बिभीषण तोंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.