सेलू-जिंतूर मतदारसंघातील राजकीय हस्तक्षेप पाहता कसरतीचे प्रशासकीय कामकाज म्हणून अनेक अधिकारी येथे येण्यास तयार नसतात. मात्र ज्या अधिकाऱ्यांचे काम चांगले आहे त्यांना सेलूकर सहजासहजी सोडत नाहीत. असा आजवर प्रशासकीय पातळीवरचा अनेकदाचा अनुभव आहे. आताही असाच प्रकार झाला आहे. सेलू उपजिल्हा रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक पदावर डॉ. संजय हरबडे यांनी जवळपास ५ वर्ष चांगले काम करून रुग्णसेवेचा सेलू पॅटर्न तयार केला होता. कोरोना काळातील त्यांचे कामकाज उल्लेखनीय ठरले होते. प्रशासकीय कारणास्तव डॉ. हरबडे यांची प्रा.आ. केंद्र ताडकळस येथे बदली झाल्याने ते सेलू येथून २७ ऑगष्ट रोजी ते कार्यमुक्त झाले होते. त्यानंतर सेलू विकास कृती समिती व विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी डॉ. हरबडे यांची सेलू येथे परत नियुक्ती करावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ सप्टेंबर रोजी डॉ. संजय हरबडे यांचे प्रा.आ. केंद्र ताडकळस येथून परत सेलू उपजिल्हा रुग्णालयात बदलीचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे सेलूकरांच्या प्रयत्नांना यश आले असेच म्हणावे लागेल.
उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार
सेलू येथे उपविभागीय अधिकारी म्हणून हिंगोली येथील जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांची नियुक्ती झाली आहे. तर सेलू येथील तहसीलदार बालाजी शेवाळे यांची उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार पदावर बदली झाली आहे. मुदखेडचे तहसीलदार दिनेश झांपले यांची सेलू येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, याबाबतचे आदेश महसूल व वन विभागाने १७ सप्टेंबर रोजी निर्गमित केले आहेत.