परभणी : सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना या आजाराचा फैलाव रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोरोना संशयितांच्या तपासण्या करण्याचे परभणी जिल्ह्याचे प्रमाण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत सर्वात कमी आहे़ तर कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा दर मात्र सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे़
जिल्हा प्रशासनाने ३ सप्टेंबर रोजी शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात फक्त १८ हजार ५४० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत़ त्यातील २ हजार ७६७ जण कोरोनाबाधित आढळल्याचे अहवालात नमूद केले आहे़ प्रत्यक्षात या दिवसापर्यंत जिल्ह्यात ३ हजार २२३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत़ चाचण्यांमध्ये मराठवाड्यात जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे़
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८९ हजार ८२१ (२४ हजार ३२२ कोरोनाबाधित रुग्ण) तर जालना जिल्ह्यात ३६ हजार ५४ (५ हजार ८८ कोरोनाबाधित रुग्ण), हिंगोली २० हजार ६२६ (१ हजार ५४५), नांदेडमध्ये ४९ हजार ९३६ (७ हजार २०७), बीडमध्ये ६४ हजार ७९८ (४ हजार ८००), लातूरमध्ये ५५ हजार ८८८( ८ हजार ७०२) तर उस्मानाबादमध्ये ३९ हजार ४६० (६ हजार १०७ कोरोनाबाधित रुग्ण) संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत़
परभणी जिल्ह्याचा मृत्यूदर ४़४५ टक्केरूग्णांच्या मृत्यूदरामध्ये मात्र परभणी जिल्हा मराठवाड्यात टॉपवर आहे़ ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात १२३ जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्रशासनाने वरिष्ठांना सादर केला़ त्याचे प्रमाण ४़४५ टक्के आहे़ मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याचा रुग्ण मृत्यूचा दर २़९४ टक्के, नांदेड ३़४९ टक्के, लातूर ३़३१ टक्के, जालना २़९३ टक्के, बीड २़७१ टक्के, हिंगोली १़२९ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २़७० टक्के मृत्यूदर आहे़ परभणीतील अधिकाऱ्यांसाठी ही चिंतनीय बाब आहे़ कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्यातही परभणी जिल्हा मागेच आहे़ जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ३९़२१ टक्के आहे़ मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ८६़२८ टक्के रिकव्हरी रेट हिंगोली जिल्ह्याचा आहे़