जिंतूर : एकीकडे आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात योजना राबवित असताना दुसरीकडे मात्र सहाशे लोकवस्ती असलेल्या जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा येथील ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही वाहतुकीस पक्का रस्ता मिळाला नाही. त्यामुळे आजारी आजीला पाठकुळीवर घेऊन एका तरूणाला चक्क ३ किलोमीटचा प्रवास भर पावसात पळत करावा लागला.
गावातील कौसाबाई चाफे (८५ वर्षे) यांना अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने आयुर्वेदिक झाडपाल्याचा इलाज करण्यात आला. परंतू त्रास कमी न झाल्याने राजकुमार या १८ वर्षीय नातवाने शेवटी आजीला रुमालाने पाठीवर बांधून पुढील इलाजासाठी जिंतूरकडे निघाला.
आतापर्यंत या गावाने अजूनही पक्का रस्ता पाहिलेला नाही. रस्ता नसल्याने कित्येक महिला वाटेतल्या माळरानावरव बाळंतीण झाल्या आहेत. अनेक मुला- मुलींनी शिक्षण अर्धवट सोडले. सर्प, विंचू, दंश, विषबाधा, अर्धांगवायू, हृदयविकार यामुळे अनेकजण कायमचे अधू झाले आहेत.
रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. प्रशासकीय यंत्रणेकडेही याबाबत लेखी पाठपुरावा केला. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला. त्यामुळे आता तरी यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
गावाला पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात कोणतेच वाहन गावात येत नाही. रेशनचे सामान, अंगणवाडीतून बालकांसाठी, गरोदर मातांसाठी येणारा आहार ३ किमी अंतरावर येऊन थांबतो. तेथे जाऊन तो गावकऱ्यांना आणावा लागतो.