गंगाखेड ( परभणी ) : चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने पेठपिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली.
पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले शिवाजी नारायणराव नरवटे वय ५१ वर्ष रा. कोळनुर ( माळहिप्परगा ) ता. जळकोट जि. लातुर. हल्ली मुक्काम नांदेड हे दि. २३ मार्च शुक्रवार रोजी दुपारी परभणी येथे जाण्यासाठी पेठपिंपळगाव येथुन पालमला आले. पालम ते गंगाखेड दरम्यान बसने प्रवास करीत असतांना दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास चालत्या बस मध्ये मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी बस मधुन प्रवास करणाऱ्या ईतर प्रवाशांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी वाहकाला याची माहीती देत तातडीने १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन केला.
बस पालम रोडवरील दत्त मंदिर चौक येथे आल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतुन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे, अधिपरिचरिका माला घोबाळे, श्रीमती हटकर, सदाशिव लटपटे यांनी त्यांना तपासले तेंव्हा त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉ. केशव मुंडे यांनी सांगितले. गंगाखेड पोलीस ठाण्याचे पो.ना.सुलक्षण शिंदे, मिलिंद जोगदंड यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन कक्षात हलवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्याची प्रकिर्या सुरू होती. मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांच्या पश्चात वृद्ध आई. पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.