मानवत (जि़परभणी) : घराच्या ओढीने नाशिक जिल्ह्यातील जातपाडा येथून पायी निघालेल्या महिलेला ३१० कि.मी. अंतराचा प्रवास केल्यानंतर मानवतमध्ये एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत ही महिला गावानजीक जागीच मरण पावल्याची दुर्दैवी घटना ५ मे रोजी पहाटे ५़३० वाजेच्या सुमारास घडली़
परभणी तालुक्यातील दैठणा हे गाव सुनीता कतार यांचे माहेर आहे़ काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते़ मात्र पतीच्या निधनानंतर कामधंद्याच्या शोधात त्या अहमदनगर येथे स्थायिक झाल्या़ काही दिवसांपूर्वी त्या नाशिक जिल्ह्यातील जातपाडा येथे त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या़ मात्र लॉकडाऊनमुळे त्या अडकून पडल्या़ दीड महिन्यांपासून बहिणीच्या घरी राहत असलेल्या सुनीता कतार यांनी दैठणा येथे आईच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला़ मात्र प्रवासासाठी वाहने बंद असल्याने त्या ३ मे रोजी पायी निघाल्या़
काही वाहनचालकांनी त्यांना थोड्या थोड्या अंतरापर्यंत मदत केली़ मात्र उर्वरित प्रवास त्यांनी पायीच केला़ सुमारे ३१० कि.मी. अंतराचा प्रवास करून ५ मे रोजी पहाटे त्या या मानवत शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील केकेएम महाविद्यालयाच्या समोरुन जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली़ त्यात त्यांचा मृत्यू झाला़ अपघातस्थळी त्यांच्याजवळील बॅग आढळली़ या बॅगेतील आधार कार्डावरून या महिलेची माहिती समोर आली़ पोलिसांनी या अपघाताची माहिती सुनीता कतार यांच्या आई निलाबाई कुºहाडे आणि मामा मधुकर कच्छवे यांना दिली़ त्यानंतर दोघेही मानवत येथे दाखल झाले़ शवविच्छेदनानंतर मृतदेह आई आणि मामाच्या ताब्यात देण्यात आला़ मधुकर कच्छवे यांच्या फिर्यादीवरुन मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार अधिक तपास करीत आहेत़
अवघ्या ५० कि. मी. अंतरावर आले होते घरनाशिक जिल्ह्यातील जातपाडा येथील ३१० किमी अंतराचा प्रवास करून मानवतजवळ आल्यानंतर सुनीता कतार यांना अज्ञात वाहनाने धडक दिली़ त्यांचे घर दैठणा येथे असून, घटनास्थळापासून ५० कि.मी. अंतरापर्यंतच त्यांना प्रवास करायचा होता; परंतु, काळाने त्यांच्यावर घाला घातला़ घर जवळ करण्यापूर्वीच सुनीता कतार यांनी मृत्यूला जवळ केले़ त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहायक निरीक्षक भारत जाधव, पोलीस नाईक मुंजाभाऊ पायघर, बेंद्रे, बळीराम थोरे, चालक खरात आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ या घटनेमुळे मजुरांच्या परतीच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़