सेलू : आपल्या सोबतचे विद्यार्थी बारावी परीक्षेत पास होतील. मात्र आपण नापास होणार या भितीने सेलू येथील एका विद्यार्थ्यांनीने निकालाच्या आदल्या दिवशी गळफास घेत जीवन संपविले. या टोकाच्या पावलाने संयुक्ता आयुष्याचा डाव हारली. ही बाब शैक्षणिक परिघात आत्मचिंतनीय ठरत आहे. संयुक्ता बालाजी उबाळे (शाहु नगर,सेलू) असे गळफास घेऊन मृत्यू पावलेल्या युवतीचे नाव आहे.
बालाजी उबाळे हे मुळचे जवळा बाजार (जि.हिंगोली) येथील असुन १० वर्षापासून ते सेलू येथे शाहुनगरात स्थाईक झाले. एक थोरली मुलगी बीसीए शिक्षण घेत आहे. तर संयुक्ता हिने नुतन महाविद्यालय सेलू येथे १२ वी वाणीज्यची परिक्षा दिली होती.परिक्षेदरम्यान तीची तब्येत ठिक नसल्याने तीला सलाईन लावावे लागले होते. परिक्षेनंतर मी नापास होणार हे शल्य तीला बोचत होते. वडील खाजगी कामासाठी लातूर येथे राहत होते. आई व दोन बहिणी सेलू येथे शाहू नगर भागात राहत असत. २४ मे रोजी संयुक्ता ही एकटीच घरी होती.२५ मे रोजी बारावीचा निकाल लागणार होता. अखेर नापास होण्याच्या चिंतेने तिने बुधवारी दुपारी ५ ते रात्री ८ या वेळेत गळफास घेऊन संयूक्ताने जीवन संपवीले. हा प्रकार आई घरी आल्यानंतर पुढे आला. त्यानंतर बालाजी महादेव उबाळे (शाहु नगर ,सेलू) यांनी सेलू पोलीस ठाण्यात खबर दिली की,२४ मे रोजी दुपारी ५ ते रात्री ८ या वेळेत माझी मुलगी संयुक्ता बालाजी उबाळे (१७) हीने बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भितीने मानसिक ताण घेत राहत्या घराच्या छताला लावलेल्या फॅनला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सपोउपनी व्हि.के.राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे.
थोडा धीर धरायला हवा होता...गुरूवारी १२ वी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये मृत्यू पावलेली संयुक्ता बालाजी उबाळे हिला ५२ टक्के गुण मिळवत ती पास झाली. कदाचित तीने आगोदर निकाल बघू नंतर काय ते ठरवू असा निर्णय घेतला असता तर संयुक्ताची आत्महत्या टळली असती, असे जड अंतकरणाने नातेवाईक सांगत होते. दरम्यान, विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याची गरज असलेला मतप्रवाह येथे व्यक्त होत होता.