परभणी : दक्षिण मध्ये रेल्वे विभागातील विद्युतीकरणाच्या कामाने गती घेतलेली आहे. यामध्ये जवळपास अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. यात शनिवारी परभणी ते मिरखेल या १६ किलोमीटर मार्गावर आणि मानवत रोड ते उस्मानपुर या ३३ किलोमीटर अशा एकूण ४९ किलोमीटर मार्गाचे सीआरएस इलेक्ट्रिसिटी ट्रायल पूर्ण करण्यात आले. या चाचणीसाठी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रिनिसिपल चीफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर पी.डी.मिश्रा यांची उपस्थिती होती.
परभणी येथून परळी जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील ६३ किलोमीटरचे विद्युतीकरण मागील वर्षी पूर्ण झाले आहे. या मार्गावर विद्युत प्रवाह सोडण्यात आला असून त्याची इलेक्ट्रिफिकेशन ट्रायल सुद्धा पूर्ण झाली आहे. याशिवाय परभणी-पूर्णा या मार्गावर मिरखेल रेल्वे स्थानकापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून १६ किलोमीटर मार्गाची ट्रायल चाचणी शनिवारी झाली. मानवत रोड ते उस्मानपुर या ३३ किलोमीटर मार्गावर चाचणी घेण्यात आली. आता केवळ परभणी ते मानवत रोड रेल्वे मार्गाचे काम काही प्रमाणात बाकी आहे. या शिवाय पूर्णा ते मिरखेल स्थानकादरम्यान १२ किलोमीटर अंतरावर फाउंडेशन वर्क सुरू आहे.
शनिवारी रेल्वे इलेक्ट्रिकेशन (कोअर) सिकंदराबाद विभागाचे प्रिन्सिपल चिफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर पी.डी.मिश्रा यांच्यासह पथक विद्युत चाचणीसाठी या मार्गावर आले होते. इलेक्ट्रिक जोडणीचे इंजिन लावून गती आणि अन्य तांत्रिक बाबी तपासून त्यांच्या उपस्थितीत हे ट्रायल घेण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप समोर आला नसला तरी ही चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आगामी काळामध्ये जलदगतीने काम पूर्ण करून उर्वरित ठिकाणची कामे केली जाणार आहेत. या वर्षात तरी किमान परभणी -परळी, परभणी-पूर्णा, परभणी-मानवत रोड एकत्रित सुरु झाल्यास पूर्णा येथूनच विद्यूतीकरणाच्या मार्गावर रेल्वे धावण्यास सुरवात होऊ शकते.
२५ हजार व्होल्टचा सोडला करंटदक्षिण मध्य रेल्वे मार्गावर परभणी जंक्शन येथून सध्या परळीकडे जाणारा मार्ग, सोबतच मिरखेलकडे जाणारा मार्ग आणि मानवत रोडकडे जाणारा मार्ग अशा तीनही मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. दोन मार्गावरील काम पूर्ण झाले तर मानवत रोड मार्गावरील काम अजून पूर्ण होणे बाकी आहे. जेथे काम पूर्ण झाले आहे, अशा ठिकाणी २५ हजार व्होल्टचा विद्युत प्रवाह सोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा याबाबत काळजी घ्यावी, रेल्वे रुळ ओलांडताना सोबतच कोणत्याही विद्यूत खांबाला हात लावू नये, असे आवाहन दमरे विभाग तसेच परभणी आरपीएफच्या वतीने करण्यात आले आहे.