- प्रशांत मुळीयेलदरी (जि. परभणी) : सुमारे ४ हजार ३०० किमी हवाई अंतराचा पल्ला पार करून मंगोलिया या देशातून पट्ट कादम हे पक्षी जिंतूर तालुक्यातील निवळी जलाशयावर दाखल झाले आहेत. येथील पक्षीमित्र गणेश कुरा व अनिल उरटवाड यांनी या पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत.
दर वर्षी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पक्ष्यांचे स्थलांतर होते. जिंतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असल्याने या भागात पक्ष्यांचे स्थलांतर होते. मंगोलिया या देशातील पट्ट कादम हे पक्षी थेट जिंतूर तालुक्यात दाखल झाले आहेत. दर वर्षी केवळ १० ते १२ पक्षी तालुक्यात येत होते. यावर्षी मात्र ही संख्या वाढली आहे. तालुक्यातील वातावरण विदेशी पक्ष्यांसाठी पोषक ठरत असल्याने या पक्ष्यांची संख्या वाढत असल्याची माहिती पक्षीमित्र गणेश कुरा व अनिल उरटवाड यांनी दिली. पट्ट कादम या नावाने ओळख असलेल्या या पक्ष्यांचे इंग्रजी नाव ‘बार हेड गुज’ असे आहे. हिवाळी स्थलांतरित पक्षी म्हणून या पक्ष्यांची गणना केली जाते. निवळी तलावावर पट्ट कादम या पक्ष्यांचे जवळपास १२० ते १५० थवे जिंतूर तालुक्यात दाखल झाले आहेत.
काय आहे वैशिष्ट्य?३२ हजार फूट उंचीवरून हे पक्षी उडतात. कमी ऑक्सिजन आणि वाढलेला वाऱ्याचा वेग अशा कठीण परिस्थितीतही या पक्ष्यांचा हा प्रवास परभणीकरांसाठी थक्क करणारा आहे. जिल्ह्यातील येलदरी व निवळी धरणावर मागील काही वर्षांपासून विविध प्रांतातून येणाऱ्या पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. निवळी तलावावर जवळपास ६७ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे, अशी माहिती पक्षी निरीक्षक गणेश कुरा व अनिल उरटवाड यांनी दिली.