पाथरी - मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाचा जोर 23 सप्टेंबरच्या पहाटे वाढला. हदगाव बु आणि कासापुरी सर्कल मध्ये मुसळधार पाऊस पडल्याने पाथरी - सेलू रस्त्यावर बोरगव्हान जवळ पुलाचे पाणी रस्त्यावर आले. तसेच पाथरी - आष्टी रस्त्यावरही हदगावजवळ पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावर काही काळ वाहतूक बंद होती.
मागील आठ दिवसांपासून परतीचा पाऊसाचा चांगलाच जोर दिसून येत आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याने गोदावरी नदीचे पात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे, आता या भागात पडणाऱ्या पावसाने ही नदी नाल्यांना पूर आला आहे. 22 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा या भागात पावसाला सुरुवात झाली होती, 23 सप्टेंबर रोजी पहाटे 4 ते 6 दरम्यान हदगाव आणि कासापुरी भागात मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. वरखेड , रेनाखळी भागात पडलेल्या पावसाने पाथरी - आष्टी रस्त्यावर हदगाव जवळील पुलाला पूर आला. त्यामुळे हा रस्ता काही काळ बंद राहिला. याच बरोबर हदगाव येथील वस्ती वरील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाणी शिरले, आंबेडकर नगर ,आझाद वस्ती भागातील काही घरात पाणी शिरले.
तसेच बोरगव्हान देवेगाव, या भागात सुद्धा मुसळधार पाऊस झाल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहिले. तर मानवत भागात पडलेल्या पावसाने पाथरी - सेलू रस्त्यावर बोरगव्हान गावाजवळ नाल्याला पूर आल्याने पुराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने काही काळ हा रस्ता ही बंद होता. तसेच पाथरगव्हाण, कासापुरी ,नाथरा या भागातही जोरदार पाऊस झाला. पहाटे 6 वाजेपर्यंत विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोराचा पाऊस पडला. तालुक्याश पाथरी शहरातही जोरदार पाऊस झाला.