परभणी : शहर परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास दीड तास जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरवासीयांची धांदल उडाली. जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून पाऊस होत असून खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन, कापूस यासह इतर पिके कोमेजून जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. याच दरम्यान बुधवारी रात्री जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. बुधवारपासून जिल्हाभरात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकरी निश्चिंत झाले आहेत.
दरम्यान, शनिवारी शहर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर जोरदार पावसाला प्रारंभ झाला. एक-दीड तास हा पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे शहरवासीयांची एकच धांदल उडाली. दरम्यान, मानवत तालुक्यातील रामपुरी बु. येथेही शनिवारी दुपारी अर्धा तास, जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा व बामणी येथे, तसेच सेलू तालुक्यात रिमझिम पाऊस झाला आहे. इतर भागात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे.
५६.९ मि.मी. पावसाची नोंद
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास परभणी शहर आणि परिसरात ५६.९ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे. या विभागाच्या नोंदीनुसार आतापर्यंत ४१३.७ मि.मी. पाऊस झाला आहे, तर महसूल प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात सरासरी ९ मिलिमीटर पाऊस झाला. मानवत तालुक्यात सर्वाधिक १७ मि.मी., सेलू १६.५ मि.मी., पूर्णा १२.६ मि.मी. आणि परभणी तालुक्यात १०.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत झालेला पाऊस
परभणी २९२.७
गंगाखेड २४६.८
पाथरी २९४.५
जिंतूर २७४.८
पूर्णा ३२८.४
पालम २८२.९
सेलू २६४
सोनपेठ ३४२.४
मानवत २७३