पूर्णा (परभणी) : दोन दिवसात तालुका व परिसरात झालेल्या पावसामुळे पूर्णा व थुना या दोन्ही नद्यां दुथडी भरून वाहत आहेत. दोन्ही नदींच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
बुधवारी (दि.१५ ) सायंकाळ पासून तालुक्यात सुरु झालेल्या पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली. तालुक्यातील पूर्णा, ताडकल्स, चुडावा या तीन मंडळात अतिवृष्टी झाली.अहेरवाडी ते पूर्णा रस्त्यावरील नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने आज दुपारपर्यत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. औंढा,हिंगोली,पाथरी,या भागातून येणारे पाणी पूर्णा नदी पात्रात समाविष्ट झाले. यामुळे पूर्णा व थुना या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहे. दुपारी १२ वाजता पाठबंधारे विभागाच्या नोंदीनुसार पूर्णा नदी पात्राची पाणी पातळी ४ मीटर वाढली आहे. तसेच नदीत अद्यापही आवक सुरूच आहे.