परभणी- जिल्हाभरात गेल्या २४ तासांत ३९ पैकी २४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून विविध ठिकाणचे नदी, नाले खळखळून वाहू लागले आहेत.
परभणी शहरासह जिल्हाभरात १५ आॅगस्ट रोजी रात्री बारा वाजेपासून पावसास सुरूवात झाली आहे. जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या २४ तासात झालेल्या पावसाच्या महसूल मंडळातील नोंदीनुसार जिल्ह्यातील ३९ पैकी २४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३८१.२७ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यातील सिंगणापूूर मंडळात ६८ मि.मी., झरी मंडळात ८८ मि.मी., पेडगाव मंडळात ६९ मि.मी., जांब मंडळात ६६ मि.मी., पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात १०४ मि.मी., ताडकळस मंडळात ६९ मि.मी., चुडावा मंडळात ७९ मि.मी., सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ मंडळात ९४ मि.मी., सेलू तालुक्यातील सेलू मंडळात १३७ मि.मी., देऊळगाव मंडळात ६५ मि.मी., कुपटा मंडळात ८८ मि.मी., वालूर मंडळात ८३ मि.मी., चिकलठाणा मंडळात १०८ मि.मी., पाथरी तालुक्यातील पाथरी मंडळात १४२ मि.मी., बाभळगाव मंडळात ८० मि.मी., हादगाव मंडळात ७९ मि.मी., जिंतूर तालुक्यातील जिंतूर मंडळात १०४ मि.मी., सावंगी म्हाळसा मंडळात ९४ मि.मी. , बोरी मंडळात ७६ मि.मी., चारठाणा मंडळात ८३ मि.मी., तर बामणी मंडळात १२४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मानवत तालुक्यातील मानवत मंडळात १६३ मि.मी., केकरजवळा मंडळात ७९ मि.मी. आणि कोल्हा मंडळात ६८ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ७३.९७ मि.मी. सरासरी पावसाची महसूल विभागाकडे नोंद झाली आहे.