मानवत (परभणी ) : जवळपास महिनाभराच्या खंडानंतर बुधवारी (दि.१५) रात्री साडेबारा वाजता सुरु झालेल्या पावसाने आज सकाळी विश्रांती घेतली. या जोरदार पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. तर आज सकाळी किन्होळी गावातून गेलेल्या कॅनॉलमध्ये एक बैलगाडी बैलासह वाहून गेली. यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला तर चालक बचावला आहे.
तालुक्यातील केकर जवळा मंडळात ७९ मि. मी, मानवत मंडळात १६३ मि. मी, कोल्हा मंडळात ६३ मि. मी पाउस पडल्याची सरासरी नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
संततधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्याप्रमाणावर पाणी आले आहे. किन्होळी गावातून गेलेल्या कॅनॉलला पाणी आले आहे. याच गावातील शेतकरी सर्जेराव कदम यांची बैलगाडी बैलासह कॅनॉलमध्ये वाहून गेली. यात दोन्ही बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. तसेच नागरजवळा पावसामुळे बापुराव शंकरराव कसारे, बाबासाहेब रामभाउ होगे, रमेश कल्याणराव होगे यांच्या घराच्या भिंती पडुन नुकसान झाले. शहरातही पावसाचा परिणाम दिसुन आला. काल पावसाने बाजार पेठेत शुकशुकाट होता. आज दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत गर्दी होती.