परभणी- जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पाऊस होत असून, मंगळवारी रात्री पालम आणि पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे़ या दोन्ही मंडळात झालेल्या धुंवाधार पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला होता़
यावर्षीच्या पावसाळ्यात शेवटच्या चरणात जोरदार पाऊस होत आहे़ आठवडाभरापासून जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी लागत आहे़ मंगळवारी परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ त्यात पालम तालुक्यातील पालम मंडळात ६६ मिमी तर पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळामध्ये ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ विशेष म्हणजे रविवारी देखील हादगाव मंडळात जोरदार पाऊस झाल्याने हादगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा आणि काही घरे पाण्याखाली आली होती़ या मंडळात सलग दुसऱ्यांदा मोठा पाऊस झाला आहे़
जिल्हाभरात दमदार पाऊस झाला असून, महसूल प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत परभणी तालुक्यात १५ मिमी, पालम ५०़६७ मिमी, पूर्णा १२़२०, गंगाखेड ९, सोनपेठ २, सेलू ११़४०, पथरी ३०, मानवत तालुक्यात ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात सरासरी १५़२५ मिमी पाऊस झाला असून, जिल्हाभरात आतापर्यंत ५६२़२८ टक्के पाऊस झाला़ सरासरीच्या तुलनेत ७२ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात सर्वाधिक ८६ टक्के म्हणजे ६६१ मिमी पाऊस झाला आहे़ त्याखालोखाल पालम तालुक्यामध्ये ८४ टक्के म्हणजेच ५९२ मिमी पाऊस झाला तर परभणी ताुलक्यात ४५७ मिमी (५६़९ टक्के), पूर्णा तालुक्यात ६९१ मिमी (८१ टक्के), गंगाखेड ५८२ मिमी (८३ टक्के), सोनपेठ ५१६ मिमी (७४ टक्के), सेलू ५०३ मिमी (६१ टक्के), जिंतूर ४८८ मिमी (६० टक्के) आणि मानवत तालुक्यात ६०८ मिमी (७४़५ टक्के) पाऊस झाला आहे़
आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा पाऊसअरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणा भागात सध्या पाऊस होत आहे़ हा पाऊस मान्सूनचा पाऊस असून, अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झाली नाही, अशी माहिती कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी दिली़ मान्सूनचा कालावधी हा सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर असा चार महिन्यांचा असतो़ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ मात्र यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन महिने मान्सून उशिराने दाखल झाला़ त्यामुळे परतीचा पाऊसही आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे़