परभणी : दोन दिवसांपासून जिल्ह्यांत संततधार पाऊस होत असून, या पावसाने हाहाकार उडविला आहे. पालम तालुक्यातील बनवस येथील १०० घरात पुराचे पाणी शिरले असून, पालम, गंगाखेड, सेलू, जिंतूर या तालुक्यातील अनेक मार्ग पुलावर पाणी आल्याने बंद पडले आहेत. शेत जमिनीत पाणी साचून पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात या वर्षी दमदार पाऊस होत आहे. दोन दिवसांपासून तर संततधार वृष्टी सुरू असून, प्रकल्प तुडुंब झाल्याने अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे पालम तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.
बनवसमध्ये १०० घरांत शिरले पाणी
पालम : तालुक्यातील बनवस येथे पुराच्या पाण्याने हलकल्लोळ माजविला आहे. पुराचे पाणी गावात शिरले असून, १०० घरे पाण्याखाली आहेत, तसेच या गावाचा संपर्क तुटला आहे. अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, घरासमोरील मोटारसायकल वाहून गेल्या आहेत.
बनवस गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या उसाव्याचे पाणी गावात शिरल्याने, अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली. अनेक कुटुंबांत दुपारपासून चुली पेटल्या नाहीत.
पालम-ताडकळ महामार्ग बंद
पालम : गोदावरी नदीवरील धानोरा काळे येथील पूल पाण्याखाली गेला असून, पालम-पूर्णा या राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
गोदावरी नदीला रात्रीपासून पूर आला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता गोदावरीची पाणी पातळी ३६४.७० मीटर एवढी होती. त्यामुळे धानोरा काळे पुलावरून पाणी वाहत असल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने वाहने अडकली आहेत. पाणी लवकर उतरण्याची शक्यता नसल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुराच्या पाण्यात अडकली बस
पालम : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाला बस पाण्यातच सोडून प्रवाशांना खाली उतरवावे लागले. ही घटना गंगाखेड ते पालम रस्त्यावर केरवाडी गावालगत घडली. जेसीबीच्या साहाय्याने बस पाण्याबाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. केरवाडी गावालगत गळाटी नदीच्या पुलावरून पाणी वहात आहे. पालमकडून येणाऱ्या बस चालकाला पाण्याचा अंदाज लागला नाही. त्यामुळे चालकाने बस तिथेच थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्याचा निर्णय घेतला. बसमध्ये १६ प्रवासी होते.