परभणी : रविवारी रात्री शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिंगळगड नाल्याच्या काठावर असलेल्या दोन वसाहतीत पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. तर दुसरीकडे याच नाल्यावरील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने परभणी- गंगाखेड रस्त्यावरील वाहतूक रात्रीपासून ठप्प झाली होती. अखेर जड वाहने वगळता इतर वाहनांची नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली.
जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून दररोेज पाऊस होत आहे. रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह रात्रभर हा पाऊस बरसला. परभणी तालुक्यात सर्वाधिक ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या पिंगळगड नाल्याला पूर आला. गंगाखेड रस्त्यावर या नाल्यावर पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी पुलाजवळूनच पर्यायी वळण रस्त्या तयार केला असून, पाणी अडविले आहे. नाल्याला पूर आल्याने वळण रस्ता वाहून गेला. तसेच तुंबलेले पाणी या भागातील बाबर कॉलनी, मंत्री नगर या वसाहतींमध्ये शिरले. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. घरासमोरील मैदानात कंबरेएवढे पाणी साचले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य भिजून नुकसान झाले आहे. दरम्यान, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांनी या भागाला भेट दिली. पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन या दोन्ही वसाहतीतील नागरिकांना सर सय्यद अहमद खान ऊर्दू प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले. याच दरम्यान पिंगळगड नाल्याजवळील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक रात्रभर ठप्प झाली होती. रविवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सरासरी १९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गंगाखेड रस्त्यावर रास्ता रोको
बाबर कॉलनी आणि मंत्रीनगर या भागातील नागरिकांनी सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गंगाखेड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. पुराच्या पाण्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, या नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली. त्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर नगरसेवक सुशील मानखेडकर, नागेश सोनपसारे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मतीन शेख नूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
वळण रस्ता गेला वाहून
गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाच्या अर्ध्या भागात चार दिवसांपूर्वी तर अर्ध्या भागात चौदा दिवसांपूर्वी स्लॅब टाकण्यात आला आहे. पुरामुळे वळण रस्ता वाहून गेल्याने तात्पुरत्या स्वरूपात नव्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र जड वाहनांच्या वाहतुकीमुळे स्लॅब खचत असल्याची बाब येथील कामगारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जड वाहने वगळता वाहतूक सुरू ठेवण्यात आली. जड वाहनांसाठी परभणे शहरातून मानवतरोड, ताडकळस मार्गे तर गंगाखेड रस्त्याने शहरात येणाऱ्या वाहनांसाठी सिंगणापूर मार्गे वाहतूक वळविल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक इंगेवाड यांनी दिली.