परभणी : रस्ते अपघाताचे वाढलेले प्रमाण सोबत वाहन धारकांची सुसाट गती यामुळे अपघाती मृत्यू वाढले आहेत. गंभीर घटनांना रोखण्यास शहर वाहतूक शाखेने वाहतूक नियम, दुचाकी हेल्मेट जनजागृती बुलेट रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत यमराजाची वेशभूषा साकारून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले. हेल्मेट तुमच्या जीवाला तारेल अन्यथा यमराज मृत्यूच्या रूपात तुम्हाला गाठेल, त्यामुळे तरी हेल्मेट वापरण्याला प्राधान्य द्या, असा संदेश देण्यात आला.
परभणी शहरातील वसमत रोड राजगोपालाचारी उद्यान येथून शनिवारी सकाळी हेल्मेट जनजागृती बुलेट रॅलीला सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, अंमलदार, जबाबदार नागरिक, बुलेट प्रेमी सहभागी झाले होते. ही रॅली वसमत रोड, विसावा कॉर्नर, नारायण चाळ, शिवाजी चौक, हनुमान चौक, जिंतूर रोड, विसावा चौकी, जिंतूर रोड मार्गाने पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
पोलीस अधीक्षकही रॅलीतपोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे घरापासूनच रॅलीच्या ठिकाणी बुलेटवर हेल्मेट परिधान करून आले होते. संपूर्ण रॅलीत त्यांनी बुलेट चालविताना हेल्मेट वापरून शहरवासियांना अनोखा संदेश दिला. यमराजाची वेशभूषा साकारलेल्या शेख मुखीद याचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले.