पाथरी (परभणी ) : शहरातील दुकानासमोर सापडलेल्या एका बालकाचा सोशल मिडीयाच्या मदतीने अवघ्या दीड तासात शोध लागला. आज दुपारी ही घटना घडली असून पोलिसांनी व्हाट्सअॅपवर पोस्ट टाकून या बालकाची माहिती दिली होती.
आज दुपारी नगर परिषदेच्या समोरील दुकानाजवळ शीतल संजय सुरवसे या मुलीस एक चिमुकला रडत असल्याचे दिसले. शीतलने त्याला घेऊन तत्काळ पोलीस स्टेशन गाठले. नीटसे बोलताही न येणाऱ्या या मुलास पोलिसांनी धीर दिला व त्याचे नाव विचारले. तेव्हा त्याने आर्यन एवढाच शब्द उचारला. यावरून पोलिस कर्मचारी सम्राट कोरडे यांनी त्याचा फोटो काढून व्हाट्सअॅपवरील विविध ग्रुपवर शेअर केला.माहितीचे आवाहन केलेला हा फोटो तालुक्यात सर्वत्र व्हायरल झाला. 'लोकमत मित्र परिवार' या व्हाट्सअॅप ग्रुपमधील उमरा येथील पोलीस पाटील सतीश लोंढे यांनी फोटो ओळखून आर्यनच्या वडिलांना फोन करून याची माहिती दिली.
विजय दाभाडे हे पत्नी व आर्यनला घेऊन आज गुरुवार बाजारासाठी आले होते. मात्र बाजारात आर्यन हरवला. दाभाडे यांनी त्याचा सर्वत्र शोध सुरु केला असताच पोलीस पाटील लोंढे यांनी फोनवरून दिलेल्या माहितीने ते तत्काळ पोलीस ठाण्यात पोहोंचले. आई -वडिलांना पाहताच चिमुकला आर्यन त्यांच्या धावत जात आईच्या कुशीत विसावला.
सोशल मिडीयाच्या सकारात्मक वापरामुळे दाभाडे कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. या तपासात पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके, हेड कॉन्स्टेबल सुनील गोरे, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब भांबट, माया मोहिते, सम्राट कोरडे यांचा सहभाग होता.