परभणी : सोनपेठ नगरपालिकेने शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यात आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यानुसार आता शहरात साचलेला कचरा, दुर्गंधी याबाबत तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता अॅप उपलब्ध झाले आहे. याचा वापर करून नागरिकांना घरबसल्या नगर परिषदेकडे तक्रार करता येणार आहे.
सध्या सोनपेठ नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत तरीही वाढत चाललेल्या शहराच्या व्यापामुळे कचरा व दुर्गंधीच्या समस्या वाढत आहेत. अनेक वेळा कचरा उचलण्यास दिरंगाई होते़ याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही़ यावर केंद्र शासनाने स्वतंत्र स्वच्छता अॅप तयार केला आहे. हा उपक्रम सोनपेठ नगरपालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ या अॅपच्या माध्यमातून आपल्या भागातील साचलेला कचरा, दुर्गंधी याचा फोटो काढून या अॅपमध्ये अपलोड करता येणार आहे़ अपलोड झालेले फोटो अॅपचे नियंत्रण करणा-या नगर परिषदेच्या टीमला उपलब्ध होणार आहे.
तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोन-तीन दिवसानंतर या तक्रारींचे निवारण झाले की नाही याचाही आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरातील कचरा उचलण्यास मदत होणार आहे़ नगरपालिकेने तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एम.बी. पवार व सचिन पोरे या दोघांची नियुक्ती केली आहे. मृत जनावरे, साचलेला कचरा, अस्वच्छ परिसर, सार्वजनिक शौचालयाच्या तक्रारीही यावर करता येणार आहेत़ त्यामुळे शहर स्वच्छ होण्यास मदत होणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे़
असे करा अॅप डाऊनलोड नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या स्मार्ट फोनमधील प्लेस्टोअरमध्ये जाऊन स्वच्छता अॅप डाऊनलोड करावा लागणार आहे़ त्यानंतर भाषा निवडून स्वत:चा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे़ त्यानंतर मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर पासवर्ड विचारलेल्या ठिकाणी ओटीपी टाकून स्वच्छता अॅप घेता येणार आहे़ अॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुमची तक्रार नोंदविता येणार आहे़ यामध्ये छायाचित्र घेण्यासाठी पर्याय असून, त्याखालीच ठिकाणही टाकावे लागणार आहे़ त्याखाली जीपीएस सिस्टीमचे चिन्ह आल्यानंतर हे चिन्ह सलेक्ट करावे लागणार आहे़ ही पोस्ट नगरपालिकेच्या सिस्टीमला जोडली जाणार असून, नियुक्त टीमला केलेली तक्रार दिसणार आहे.