परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, सोमवारी १४७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील हा उच्चांक असून, दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
महिन्याभरापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज ४० ते ५० रुग्णांची नोंद होत होती. सोमवारी मात्र १४७ नवीन रुग्णांची भर जिल्ह्याच्या यादीत पडली आहे. आरोग्य विभागाला १ हजार ७६१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ५३६ अहवालांमध्ये ९२ आणि रॅपिड ॲन्टिजेन टेस्टच्या २२५ अहवालांमध्ये ५५ असे एकूण १४७ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या अधिकपटीने वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे सत्रही सुरू झाले आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत परभणीत मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने भीतीचे वातावरण आहे. सोमवारी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन पुरुषांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ९ हजार ४२० झाली असून, ८ हजार ६२४ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४५१ वर पोहोचली आहे. सध्या शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ८७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे १३२ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर २४२ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
परभणी तालुक्यात ८८ रुग्ण
सोमवारी जिल्ह्यात नोंद झालेल्या १४७ रुग्णांपैकी परभणी तालुक्यामधील ८८ रुग्णांचा समावेश आहे. जिंतूर तालुक्यात २६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे सेलू १०, पाथरी ५, पालम १, मानवत २, गंगाखेड ४ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये २ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे पुणे, हिंगोली या जिल्ह्यातील नागरिक परभणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.