श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे श्रावण महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक दर्शनासाठी येतात. श्रावणातला प्रत्येक शनिवारी भाविकांची येथे गर्दी होते. अनेक भाविकांचे नृसिंह हे कुलदैवत असून पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक श्रावणातल्या शनिवारी पायी वारी करतात. आज श्रावणातला पहिला शनिवार असल्याने येथे दर्शनासाठी न येता आल्याने भाविकांचा हिरमोड झाला तर अनेक भाविक पोखर्णीत येऊन बंद मंदिराच्या पायरीचे दर्शन घेऊन गेले. मागील २ महिन्यांपूर्वी नृसिंह जन्मोत्सवही लॉकडाऊनमध्ये भाविकांविना साजरा झाला.
लाखो रुपयांची उलाढाल थांबली
श्रावण महिन्यात मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. भाविकांकडून येणाऱ्या देणग्या व परिसरातील दुकानावरील खरेदी असे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहे. तसेच मंदिरासमोरील प्रसादाची दुकाने, छोटी-मोठी व्यापारी यांची दुकाने भविकांच्या व ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. मंदिराचे पुजारी, ब्राह्मण यांचाही आर्थिक स्त्रोत बंद झाला आहे. यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.