गंगाखेड तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार व त्यांचे पॅनलप्रमुख एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असल्याचे चित्र गावागावांत पहावयास मिळत आहे. तालुक्यातील धनगरमोहा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गावातील भगवान माधवराव खांडेकर या तरुण पुढाऱ्याने ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावातील ४० ते ५० लोकांना एकत्र जमवून विनापरवाना सभा घेतली. तसेच स्वतःचा फोटो असलेल्या बॅनरवर तीन पिढ्या दिल्या, बदल करून बघा फरक पडतो, असा मजकूर लिहून हा बॅनर समाजमंदिराजवळ लावला. त्यानंतर आदर्श आचारसंहितेचा भंग केला असल्याची बाब ५ जानेवारी रोजी धनगरमोहा ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका अयोध्या रामजी फड यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आचारसंहिता प्रमुख पी. बी. चाटे यांच्याकडे याचा अहवाल सादर केला. त्यानंतर पी. बी. चाटे यांनी दिलेल्या आदेशावरून ग्रामसेविका अयोध्या फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ५ जानेवारी रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात भगवान माधवराव खांडेकर यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार रतन सावंत, पो. ना. सुनील लोखंडे, दत्तराव पडोळे हे करीत आहेत.
विनापरवाना सभा घेऊन बॅनर लावणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:52 AM