राज्य शासनाकडून विविध निवडणुका, सण, उत्सव, समारंभ आदी प्रसंगी होमगार्डस्ना बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक दिवसासाठी ६९० रुपये प्रतिदिन मानधन देण्यात येते. जिल्ह्यात एकूण ९०० होमगार्डस् आहेत. यातील जवळपास ८७० होमगार्डस् बंदोबस्त कामी नियुक्त असतात. राज्य विधानसभेच्या ऑक्टोबर २०१९ मध्ये निवडणुका झाल्या. त्यानंतर बंदोबस्त कामी नियुक्त होमगार्डस्ना यासाठीचे मानधन मिळणे अपेक्षित होते; परंतु हे मानधन जवळपास १६ महिने या होमगार्डस्ना मिळाले नाही. त्यामुळे होमगार्डस्मधून नाराजी व्यक्त केली जात होती. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची शासनाने दखल घेऊन सन २०१९ मधील बंदोबस्त कामी कर्तव्य केलेल्या होमगार्डसचे भत्ते व २०१९ मधील उजळणी प्रशिक्षण शिबिरास उपस्थित होमगार्डसचा भोजन भत्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. तसेच २०१९ मधील विधानसभा निवडणूक व होमगार्ड संमेलन २०१९ चे भत्ते सोमवारी संबंधित होमगार्डच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे होमगार्डस्मधून समाधान व्यक्त केले जात आहे.
होमगार्डस्चे मानधन खात्यावर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:16 AM