गंगाखेड: गंगाखेड-सोनपेठ रस्त्यावर बसमध्ये विसरलेली कॅरीबॅग त्यातील पैसे व दागिन्यांसह प्रवाशाला परत करून चालकाने आपला प्रमाणिकपणा दाखवून दिला आहे. चालकाच्या या प्रामाणिकपणाची चर्चा होत आहे.
गंगाखेड आगारातील बस २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सोनपेठहून सायंकाळी ७ वाजता ही बस स्थानकात परत आली. तेव्हा आगारात बस जमा करताना बसचालक गोविंद विठ्ठल राठोड यांनी बस तपासली असता त्यांना एक कॅरीबॅग सापडली. यात आधार कार्डासह काही कागदपत्रे व रोख नऊ हजार रुपये तसेच सोन्याच्या दोन अंगठ्या असलेली डबी आढळून आली. गोविंद राठोड यांनी ही कॅरीबॅग बसस्थानकाचे सहायक वाहतूक निरीक्षक भगवान मिश्रा यांच्याकडे सुपुर्द केली. बॅगमध्ये असलेल्या आधार कार्डावरील नावावरून वामन रामचंद्र धोंडगे (रा. तिवठाणा ता. सोनपेठ) यांना संपर्क करत त्यांना बसस्थानकात बोलावून घेत कॅरीबॅगमधील सामानाची ओळख पटवून सदर ऐवज त्यांना सुपूर्द केला. वयोवृद्ध वामन रामचंद्र धोंडगे यांना ऐवज परत मिळाल्याने त्यांनी चालक व वाहकाचे आभार मानले. यावेळी आगारप्रमुख किशनराव कराळे, सहायक वाहतूक निरीक्षक भगवान मिश्रा यांची उपस्थित होती.