लघू विक्रेत्यांना नुकसानीची झळ
परभणी : जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे लघू विक्रेत्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. तीन आठवड्यांपासून व्यवसाय ठप्प असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न या विक्रेत्यांसमोर उभा ठाकला आहे. जिल्हा प्रशासनाने विक्रेत्यांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
जलवाहिनीचे काम शहरात गतीने
परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानात उभारलेल्या जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू केला जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्याचे काम सुरू आहे. येथील वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात सध्या हा व्हॉल्व्ह बसविला जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम करण्यात आले आहे.
उन्हामुळे वाढली झाडांची पानगळ
परभणी : जिल्ह्यात उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, झाडांची पानगळ होत आहे. रस्त्याच्या कडेने असणारी हिरवी झाडे आतापर्यंत पाना-फुलांनी बहरलेली होती. मात्र, आता या झाडांची पानगळ होत असल्याने, वातावरणात भकासपणा निर्माण झाला आहे. पानगळ झाल्याने झाडांची सावलीही शिल्लक राहिलेली नाही.
नो-पार्किंगमध्ये उभी राहतात वाहने
परभणी : येथील रेल्वेस्थानक परिसरात नो-पार्किंग झोन असताना, अनेक वाहनधारक बिनधास्तपणे या भागात वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे अडथळे पार करून रेल्वे स्थानक गाठावे लागते. अनेक प्रवाशांना वेळेत स्थानकात पोहोचणेही अवघड होत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
परभणी : शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. खड्डे चुकवितच वाहने चालवावी लागतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सध्या ठप्प आहेत. आता तर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या कामांना कधी मुहूर्त लागतो, असा सवाल उपस्थित होत आहे.
जि.प. इमारतीचे काम संथगतीने
परभणी : शहरातील जिल्हा परिषदेचे इमारत बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. अंतर्गत कामे मात्र संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे जि.प. कार्यालयाचे नवीन इमारतीत होणारे स्थलांतर लांबणीवर पडत आहे. सध्या शहरातील विविध भागांत जिल्हा परिषदेच्या कार्यालयांचे काम चालते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरावे लागत आहे.
कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात
परभणी : जिल्ह्यात या वर्षी पाच साखर कारखाने सुरू झाले आहेत. आतापर्यंत कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप केले असून, आता हा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखाना प्रशासनाने समोर ठेवले आहे.