परभणी : सायलेन्सरला फोडून फटाक्यासारखे आवाज काढत वाहन चालवण्याची क्रेझ तरुणांमध्ये रुढ झाली आहे. मोठा आवाज करीत वाहन चालविणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याने वाहतूक शाखेने याविरुद्ध कारवाई केल्यानंतरही त्यास लगाम बसत नसल्याची स्थिती जिल्ह्यात आहे.
शहरी भागात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच कर्णकर्कश्य हॉर्न गाडीला बसवून त्याचप्रमाणे बुलेटसारख्या गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये छेडछाड करुन फटाके वाजल्याचा आवाज काढत वाहने चालविली जातात. शहरी भागात हा प्रकार अधिक आहे. वाहतूक शाखेने याविरुद्ध कारवाई केली तरी त्यावर फारसा पायबंद बसलेला नाही. वाहनांचे सायलेन्सर फोडून मोठा आवाज करीत वाहने चालविल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह हृदयरोगाचे रुग्ण आणि आजारी व्यक्तींना अधिक होतो. येथील वाहतूक शाखेने याविरुद्ध वर्षभरात अनेक वेळा दंडात्मक कारवाई केली. मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ही वाहने आजही मोठा आवाज करीत रस्त्यांवरुन धावतात. त्यामुळे याविरुद्ध आता कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोठ्या आवाजाच्या हॉर्नवर होईना कारवाई
सायलेन्सरच्या आवाजाबरोबरच काही वाहनांना चित्र-विचित्र हॉर्न बसविलेले असतात. या हॉर्नमुळे अनेक वेळा समोरचा व्यक्ती घाबरतो किंवा दचकतो. याशिवाय मोठ्याने हॉर्न वाजवित शहरातील रस्त्यांवरुन धावणाऱ्या वाहनांची संख्याही अधिक आहे. अशा वाहनांवर सहसा कारवाई होत नाही. त्यामुळे हे प्रकार वाढत चालले आहेत. शहरातील अरुंद रस्ते, वाढलेली वाहने आणि त्यात नियम डावलत वाहने चालविल्याने त्याचा त्रास इतर वाहनधारकांना सहन करावा लागतो. त्यामुळे याविरुद्ध कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
सायलेन्सरचे आवाज करीत फिरणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे दिवसभर माईकद्वारे आवाहन करीत वाहनांना सायलेन्सर, मोठ्या आवाजाचे हॉर्न वापरण्यास प्रतिबंध असल्याचे सांगितले जाते. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास सायलेन्स, हॉर्न जप्त करण्याची कारवाई केली जाते.
नितीन काशीकर, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
दंड करुन सायलेन्स जप्त
सायलेन्सरचा आवाज मोठा असेल तर त्या वाहनधारकाला दंड आकारला जातो. त्याचप्रमाणे सायलेन्सर जप्त करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात अशा पद्धतीच्या कारवाई मागील वर्षात केल्या आहेत. मोठ्या आवाजाच्या हॉर्नच्या संदर्भातही अशाच पद्धतीने कारवाई करण्याची तरतूद आहे.