जिंतूर तालुक्यातील दूधगाव हे १० हजार लोकवस्तीचे गाव असून, येथे शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने गाव परिसरातील ग्रामस्थ बाजाराबरोबर जनावरांनाही उपचारासाठी घेऊन येतात. मात्र, मागील काही दिवसांपासून या दवाखान्यातील अधिकारी, कर्मचारी व डॉक्टरांच्या लहरीपणाचा फटका पशु पालकांना बसत आहे. २४ सप्टेंबर रोजी बाजाराच्या दिवशी ५ पशुपालकांनी आपली जनावरे तपासण्यासाठी दवाखाणन्यात आणली होती. मात्र, या ठिकाणी डॉक्टर हजर नसल्याने दवाखाना बंद होता. त्यामुळे पशुपालकांना आपली जनावरे परत घेऊन जावी लागली. दवाखान्यात औषधांचा साठा उपलब्ध असूनसुध्दा ती औषधे जनावरासाठी मिळत नाहीत. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनावरे आजारी पडत आहेत. लाख मोलाचे पशुधन उपचाराअभावी मृत्यू पावले तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडतो. मात्र, याचे काही घेणे-देणे या दवाखान्यातील अधिकारी, कर्मचारी वा डॉक्टरांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डॉक्टरांना वेळ मिळाला तरच दवाखाना सुरु राहील, अशा आशयाचा बोर्ड तरी दवाखाना प्रशासनाने लावावा, अशी तीव्र प्रतिक्रिया पशुपाुकांमधून उमटत आहे.
या दवाखान्यातील डॉक्टरांच्या मनमानी कारभाराची वरिष्ठांनी चौकशी करून त्यांना समज देऊन त्यांची बदली करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी आक्रमक होऊन उपोषण करणार आहेत,
सु. ना. गरगडे पशुपालक, दूधगाव.