दहावीचा अभ्यासक्रम
दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून काठिण्य पातळीवरील काही गद्य व पद्य कमी करण्यात आले आहेत. काही ऐतिहासिक संदर्भाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न वगळण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सर्वच विषयांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला असल्याने एक प्रकारे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी उर्वरित अभ्यासक्रम निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करून पुन्हा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्याची तारेवरची कसरत शिक्षकांना करावी लागणार आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी - पालक अभ्यासक्रम ठराविक वेळेत पूर्ण होतो का? याबाबत चिंतीत असताना तो पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
बारावीचा अभ्यासक्रम
बारावीचा २० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने दिले असले तरी याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत कसल्याही प्रकारचा लेखी आदेश शाळांना मिळाला नसल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रम शिकविण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८० गुणांची कृती प्रत्रिका बनवण्याचे काम शिक्षण मंडळाकडून सुरू आहे.