जिंतूर (जि. परभणी) : अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडल्यानंतर ट्रॅक्टर कसे काय पकडले? असा सवाल जिंंतूर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने थेट उपविभागीय अधिकाऱ्यांना मोबाईलवरून केल्याने वाळूमाफिया आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे संबंध उघडकीस आले आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी थेट पोलीस ठाणे गाठून संबंधित कर्मचाऱ्याचा मोबाईल जप्त केला. तसेच हा अहवाल वरिष्ठांना पाठविण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांना दिले. हा सर्व प्रकार १८ फेब्रुवारी रोजी पहाटे घडला.
उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी जिंतूर शहरात पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास एम.एच. २७-००९८ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या वाळुची वाहतूक होत असल्याचे पाहून ट्रॅक्टर पकडला. या कारवाईनंतर ट्रॅक्टरचालकाने जिंंतूर येथील पोलीस निरीक्षकाच्या वाहनचालकाला कोणी तरी आपले ट्रॅक्टर पकडले आहे, असे मोबाईलवर सांगितले. त्या वाहनचालकाने मोबाईल ट्रॅक्टर पकडणाऱ्याकडे द्या, असे सांगितल्यानंतर चालकाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मोबाईल दिला. तेव्हा ट्रॅक्टर पकडणारे तुम्ही कोण? आणि ट्रॅक्टर कसा काय पकडला? असा सवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना केला. त्यावर पारधी यांनी आपण उपजिल्हाधिकारी आहोत, असे सांगताच त्या पोलीस कर्मचाऱ्याची बोबडीच वळली.
या प्रकरणानंतर पारधी यांनी थेट पोलीस ठाणे गाठून वाहनचालकाचा मोबाईल जप्त करून त्यातील सर्व रेकॉर्र्डिंग जप्त केले. पोलीस निरीक्षकांना बोलावून घटनेचा पंचनामा केला आणि या संदर्भातील अहवाल वरिष्टांना पाठविण्याच्या सूचना केल्या. या प्रकारामुळे पोलिसांचे वाळूमाफियांशी आर्थिक संबंध उघड झाले.
वाळूमाफियांशी संबंध असलेल्या १८ रेकॉर्र्डिंग सापडल्यावाळूमाफियांशी संबंध असणे, पैशांची मागणी व इतर अनेक महत्त्वपूर्ण १८ रेकॉर्र्डिंग महसूल अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष जप्त केल्या आहेत. महसूल प्रशासन कारवाईला जात असताना त्यापूर्वीच माळूमाफियांपर्यंत माहिती पोहोचत असल्याने महसूलच्या अधिकाऱ्यांना मोठी कारवाई करण्यात यश मिळत नव्हते.
कडक कारवाई करणार-पारधीशासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांवर कडक कारवाई करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच प्रशासनातील खबऱ्यांचाही शोध घेणार असल्याचे ते म्हणाले.