परभणी : गेल्या महिनाभरात जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २५ रुपये ५० पैशांनी वाढ झाली असून आता हे सिलिंडर ८६० रुपये ५० पैशांना मिळत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य चांगलेच हैराण झाले आहेत.
देशात गेल्या काही दिवसात इंधनाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामध्ये पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी पार केली आहे. तर डिझेलचे दर शंभरीच्या घरात गेले आहेत. त्यामुळे महागाईचा आलेख चांगलाच वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकीनऊ आले असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात गॅस सिलिंडर २५ रुपये ५० पैशांनी महागले आहे. आता हे सिलिंडर ८६० रुपये ५० पैशांना मिळत आहे. त्यामुळे एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्यांना आर्थिक ताण देणारी ठरत आहे.
उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी वाऱ्यावर
केंद्र शासनाच्या वतीने मोठा गाजावाजा करून १ मे २०१६ रोजी देशात उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली होती. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पूर्वी बऱ्यापैकी सबसिडी मिळत होती. नंतर सबसिडीची रक्कम १८८ रुपयांवर आणली गेली. आता तर फक्त ९ रुपये ४५ पैसे सबसिडी लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे ही सबसिडी न मिळाल्यातच जमा आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. केंद्र शासन योजना नावालाच सुरू करते, नंतर मात्र लाभार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्यात येते, अशी ओरड लाभार्थ्यांमधून होत आहे.
गावांत पुन्हा चुली पेटल्या
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता सर्रास चुलीकडे वळताना दिसत आहेत.
गॅसचे भाव वाढत असल्याने सिलिंडरसाठीची रक्कम आणायची कुठून, असा आम्हा गरिबांपुढचा प्रश्न आहे. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया सेलू तालुक्यातील सोजरबाई सुरोसे यांनी दिली.
दिवसेंदिवस गॅसचे भाव वाढत असल्याने हे गॅस सिलिंडर घरातील कोपऱ्यात ठेवण्याची वेळ आली आहे. आता चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे गॅसचे दर कमी होण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया भारतबाई खंदारे यांनी दिली.
गेल्या ६ महिन्यांपासून कधी गोडेतेल महाग होते तर कधी सिलिंडर महाग होते. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न पडला आहे. सरकारने सर्वसामान्य जनतेचा थोडा तरी विचार करावा. आमची खूप ओढाताण होत आहे.
- सुलक्षणा कचरे, गृहिणी
कोरोनामुळे अगोदरच रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे रोजचा दिवस कसा काढावा, असा प्रश्न पडला असताना सातत्याने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे घरखर्च भागवताना कसरत करावी लागत आहे.
- लक्ष्मीबाई काळे, गृहिणी