परभणी जंक्शन येथून सध्या २२ ते २४ रेल्वेची ये-जा सुरू आहे. या सर्व रेल्वे पूर्वीसुद्धा धावत होत्या. त्याच रेल्वेंना विशेष रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे तिकिटाचे दर वाढले. मात्र, प्रवासाचा वेळ आणि इतर सुविधा मात्र प्रवाशांना मिळेनाशा झाल्या आहेत. नांदेड तसेच औरंगाबाद जाण्यासाठी पूर्वी लागणाऱ्या साधारण तिकिटाच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. यामुळे रेल्वेचा प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे
नांदेड-मुंबई तपोवन
नांदेड-बंगुळरू
नांदेड-पनवेल
नांदेड-पुणे
सिकंदराबाद-मनमाड
सिकंदराबाद-मुंबई
औरंगाबाद-हैदराबाद
नांदेड-अमृतसर
नांदेड-मुंबई राज्यराणी
तिकिटात दुप्पट फरक
कोेरोनापूर्वी धावणाऱ्या रेल्वेला नांदेडचे एक्स्प्रेस तिकीट ३५ रुपये होते. सध्या हेच तिकीट स्थानकावर आरक्षण करून ५० रुपये, तर ऑनलाईन आरक्षण काढल्यास ७० रुपये लागत आहेत.
औरंगाबादच्या बाबतीत साधारण तिकीट ७० रुपये होते. सध्या आरक्षण काढून सिटिंगचे तिकीट १०० रुपये, तर स्लीपरसाठी १४० रुपये मोजावे लागत आहेत. यासह एसीच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
मुंबईला जाण्यासाठी केवळ एक्स्प्रेसला १७० रुपये लागत होते. आता तपोवनला हेच तिकीट २६० रुपये लागत आहेत, तर मुंबईला जाण्यासाठी स्लीपरला ३७० रुपये लागत होते. सध्या हेच तिकीट ५०० रुपये एवढे झाले आहे.
आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
पुणे - मुंबईसारख्या ठिकाणी जाण्यास आरक्षणाची गरज असते. मात्र, परभणीहून नांदेड, पूर्णा, सेलू, जालना या मार्गावर दररोज ये - जा करणाऱ्यांसह ऐनवेळी प्रवासाला जाणाऱ्यांची आरक्षणाच्या सक्तीमुळे अडचण होत आहे. याकरिता रेल्वे विभागाने तिकीट काऊंटर सुरू करून साधारण तिकीट दर लागू करून प्रवासाला जाण्याची मुभा द्यावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
प्रवासी म्हणतात
पॅसेंजर रेल्वे सुरू नाहीत. याचा फटका तर बसत आहे. मात्र, त्याचबरोबर दररोज अप-डाऊन करण्यासाठी पासही दिला जात नाही. तसेच जेव्हा ऐनवेळी प्रवासाला जायचे तेव्हा आरक्षण मिळत नाही. अशा वेळी अडचण होते. यासाठी साधारण तिकीट सुरू करावे. गावाला येण्या - जाण्यातच दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. - विनोद काळे.
नांदेडहून परभणीला येण्यासाठी दररोज आरक्षण काढणे परवडत नाही. यामुळे खासगी वाहनाने तसेच बसने ये-जा करावी लागत आहे. रेल्वेचा पर्याय सोपा असताना आरक्षणाच्या सक्तीमुळे प्रवासाला जाणे कठीण होऊन बसले आहे. यात अतिरिक्त पैसे जात आहेत. याचा विचार करून साधारण तिकीटप्रणाली लागू करावी. - गोपाल यादव.