परभणी : सर्वसामान्यपणे जीवन जगताना नागरिक काटकसर करतात. परंतु, पेट्रोलपंपावर मात्र वाहनात पेट्रोल भरत असताना सर्रासपणे दुर्लक्ष करून मीटर रीडिंगवरील शून्य पाहण्याचीही तसदी बहुतांश ग्राहक घेत नसल्याची बाब बुधवारी केलेल्या पाहणीत दिसून आली.
पेट्रोल आाणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. परंतु, त्यानंतरही पेट्रोल खरेदी करताना अनेक ग्राहकांमध्ये जागरुकता नसल्याचे पहावयास मिळाले. पेट्रोलपंपावर वाहनात पेट्रोल भरताना ते बरोबर आले का? मीटर रीडिंगवर शून्य होते का? याचीही पाहणी अनेक ग्राहक करीत नाहीत आणि त्यांची फसवणूक होते. त्यामुळे इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात काटकसर करणारे पेट्रोल भरताना मात्र निष्काळजीपणा करीत असल्याचे दिसून आले.
वर्षभरात केवळ १ तक्रार
जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर मीटरमध्ये हेराफेरी होऊ नये, याची तपासणी करण्याची जबाबदारी वैधमापनशास्त्र विभागाकडे आहे.
पेट्रोल आणि डिझेल भरताना त्रुटी आढळल्यास नागरिक या विभागाकडे थेट तक्रार करू शकतात. या तक्रारीनुसार विभागाकडून तपासणी केली जाते.
त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ आढळली तर जिल्ह्याच्या पुरवठा विभागाकडे तक्रार करण्याची मुभा आहे. मात्र या तक्रारींचे प्रमाणेही नगण्य आहे. जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर मीटरमध्ये हेराफेरी होऊ नये, याची तपासणी करण्याची जबाबदारी वैधमापनशास्त्र विभागाकडे आहे.
वर्षभरात नियमित तपासणी
वैधमापन विभागात पेट्रोलपंपाच्या मीटरची नियमितपणे तपासणी केली जाते. त्यासाठी प्रत्येक निरीक्षकाला विभाग वाटून देण्यात आले आहेत. त्या त्या विभागांतर्गत निरीक्षक वेळोवेळी तपासणी करतात.
पेट्रोलपंपांवर इलेक्ट्रॉनिक मीटर आल्याने काट्यामध्ये हेराफेरी होण्याची शक्यता कमीच असते. वैधमापन विभागाकडूनही वेळोवेळी तपासण्या केल्या जातात. पेट्रोलपंपांच्या संदर्भातील तक्रारींची संख्या मात्र कमी आहे.
पी.आर. परदेशी,
सहायक नियंत्रक वैधमापन