परभणी : श्रावण महिन्यात उपवासाचे महत्त्व असते. हीच बाब व्यापाऱ्यांनी हेरल्याने उपवासासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर श्रावण सुरू होताच वाढले आहेत. भगर आणि शेंगदाणा यांच्या दरांमध्ये श्रावण सुरू होताच, १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.
उपवासाच्या पदार्थांचे दर प्रतिकिलो भगर ११० रुपये, साबुदाणा ९५ रुपये, नायलॉन साबुदाणा ८०, शेंगदाणे ११० रुपयांपर्यंत वाढले आहेत. परभणीच्या बाजारपेठेत शेंगदाणा, तसेच साबुदाणा व अन्य खाद्यपदार्थ अकोला, लातूर, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांसह परराज्यातून आयात होतात. मागील महिन्यात व सध्या वाढलेल्या दरामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम सर्वच जीवनावश्यक वस्तूंवर होत आहे. त्यात उपवासाच्या पदार्थांचाही समावेश आहे. या दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. एवढे दर का वाढले, असे प्रश्न विचारून ग्राहक व्यापाऱ्यांना भंडावून सोडत आहेत.
साबुदाणा आरोग्याला हानिकारक
साबुदाणा, शेंगदाणे उपवासाच्या दिवशी खाऊ नयेत. हे पदार्थ खाल्ल्याने पोट भरल्याची संवेदना निर्माण होते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी हे पदार्थ खाल्ल्याने हमखास पोट बिघडते. याऐवजी पचायला हलके पदार्थ घ्यावेत.
उपवास आहे, मग हे खा....
राजगिरा, दुधाचे सेवन उपवासाला खावेत. उपवास करणाऱ्यांनी एक दिवस हलका व कमी आहार घ्यावा. शक्यतो, साबुदाण्याऐवजी भगर खावी, तसेच फलाहार घेऊन उपवास सोडावा.