परभणी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात परभणी जिल्ह्याचा निकाल अपेक्षितरित्या ९०.४२ टक्के लागला असून यात वर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे पुढे आले. जिल्ह्यातील २३ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
बारावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २६ हजार ५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २३ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ९०.४२ टक्के इतकी असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले. यात डिस्टिंक्शनमध्ये २ हजार ७६५ विद्यार्थी आले असून प्रथम श्रेणीत ९ हजार ४७८ तर द्वितीय श्रेणीत ८ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या निकालात सायन्स विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत आपला निकाल सर्वाधिक ९७.१३ टक्के दर्शवला. यात १४ हजार ६२ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आर्टमध्ये ९ हजार ६३२ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ५९४ म्हणजेच ८१.५ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले. तर कॉमर्समध्ये २०१३ विद्यार्थ्यांपैकी १७६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८९.९८ इतकी आहे. तंत्रशिक्षण विभागातील २८३ विद्यार्थ्यापैकी २०३ विद्यार्थी तर टेक्निकल सायन्समध्ये ६५ पैकी ५६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या बारावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारल्याचे पुढे आले. मुलं उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.२३ तर मुलींचे ९३.४६ टक्के आहेत.