परभणी : बर्ड फ्लूचा प्राण्यातील विषाणू संसर्ग माणसांमध्ये येण्याची शक्यता फारच कमी आहे. या विषाणूच्या ठरावीक अँटीजन जोड्या एकत्र आल्या तरच त्या धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूने कोंबड्यांचा मृत्यू झाला असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन येथील डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
मुरुंबा येथील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल रविवारी रात्री जिल्ह्यात धडकल्यानंतर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, बर्ड फ्लू नेमका काय आहे? हा आजार कोठून आला? आणि प्राणी, पक्ष्यांमध्ये होणाऱ्या या आजाराचा माणसांना कितपत धोका आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. संसर्गजन्य आजाराचे अभ्यासक डॉ. रामेश्वर नाईक यांच्याशी या आजाराविषयी चर्चा केली. त्यांनी सांगितले. बर्ड फ्लू हा एन्फ्लूएन्झा व्हायरस आहे. प्राण्यांमध्ये हा आजार आढळतो. मात्र, प्राण्यांमधून माणसांत या आजाराचे संक्रमण होण्याची शक्यता कमी आहे. एन्फ्लूएन्झा व्हायरसला एच आणि एन असे दोन प्रकारचे अँटीजन असतात. एच हा अँटीजन १ ते १६ प्रकारात, तर एन हा अँटीजन १ ते ९ प्रकारांत आढळतो. एच आणि एन या अँटीजनच्या पाच जोड्यांचे एकत्रीकरण झाल्यास तो संसर्ग माणसात पसरू शकतो. त्यात एच १ एन १ (स्वॉइन फ्लू), एच १ एन २, एच २ एन १, एच २ एन २, एच ३ एन १ आणि एच ३ एन २ हे पाच अँटीजन प्राण्यातून माणसांत संसर्ग पसरू शकतात. त्यामुळे बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, हे विषाणू ड्रीफ्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वत:ची, कुटुंबीयांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. रामेश्वर नाईक यांनी केले.
१९९७ मध्ये सर्वप्रथम आढळला रुग्ण
एच ५ एन १ या प्रकाराचा व्हायरस प्राण्यांमधून माणसांत येऊ शकतो. हायली पॅथोजनिक एव्हीन एन्फ्लोझा (हाफाई) असे या आजाराचे नाव आहे. १९९७ मध्ये प्राण्यांतून हा आजार माणसांत आल्याची नोंद आहे. त्याचप्रमाणे २००३ मध्येही अशा प्रकारचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आढळलेला व्हायरस कोणत्या जातीचा आहे? हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बर्ड फ्लूचा प्रवास भारतातील ढोकरीझ, कावळा, पोपट आणि कोंबडी या चारच पक्ष्यांत हा विषाणू आतापर्यंत आढळला आहे. परदेशातील हाल्कन हे पक्षी ऑक्टोबर महिन्यात भारतात स्थलांतरित होतात. या पक्ष्यांच्या माध्यमातून हा विषाणू भारतात आला असावा. भारतातील ढोकरी या पक्ष्यामध्ये तो सर्वप्रथम आढळला. आता कोंबड्यांमध्ये आढळत आहे.