कोरोना रुग्णांना शोधण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. महानगरपालिका, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या तपासण्या होत आहेत; परंतु मागच्या आठवड्यात मात्र दररोज केवळ ७०० ते ८०० नागरिकांच्याच तपासण्या होत असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अहवाल मात्र दररोज साडेतीन हजार रुग्णांचे दिले जातात. त्यामुळे हे अहवाल किमान सात दिवसांत पूर्वीचे असल्याचे स्पष्ट होत आहे. अहवालास विलंब लागत असल्याने अनेक वेळा कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्यास पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्तापही सहन करावा लागत आहे.
१ ते ७ एप्रिल या काळात जिल्ह्यात ४ हजार १०० नागरिकांच्या तपासण्या झाल्या; परंतु याच दिवसांमध्ये दररोज अडीच ते तीन हजार नागरिकांचे अहवाल प्रशासनाने दिले आहेत. बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दर्शविली जात आहे. एकीकडे तपासण्या कमी आणि जुन्या अहवालातून रुग्णांची संख्या मात्र वाढलेली दिसत आहे.
येथील जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर तपासणी करण्याची प्रयोगशाळा कार्यरत आहे. या प्रयोगशाळेची क्षमता दोन हजार तपासणी करण्याची असताना दररोजची ७०० ते ८०० अहवालही दररोज तपासले जात नाहीत. उलट दुसरीकडे खासगी प्रयोगशाळेत मात्र स्वब नमुना दिल्यानंतर काही तासांमध्ये त्याचा अहवाल प्राप्त होतो. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने तपासण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच वेळीच अहवाल दिल्यास कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचारही मिळून संसर्ग वाढणार नाही.