- राजन मंगरूळकरपरभणी : शहरातील गांधी विद्यालय कृषी सारथी कॉलनी भागातील मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी बुधवारी सायंकाळी पाच वाजेनंतर अचानक महिला आणि पुरुष मतदारांनी मतदानासाठी एकच गर्दी केली. यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता.
निवडणूक विभाग आणि यंत्रणेच्या वतीने ही प्रक्रिया राबविताना प्रशासकीय यंत्रणांनी गेटच्या आतमध्ये आलेल्या सर्व मतदान करण्यासाठीच्या पुरुष आणि महिला मतदारांना रांगेत थांबून त्यांचे मतदान पूर्ण करून घेण्यासाठी प्रक्रिया राबविली. सायंकाळी सहा वाजेनंतर सुद्धा शेकडो मतदार रांगेत असल्याचे चित्र दिसून आले. या केंद्रावर सायंकाळी साडेसहा वाजता मतदान प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण आठ वाजेपर्यंत कालावधी लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
या मतदान केंद्रावर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी साडेसहा वाजता भेट दिली. त्यांच्या समवेत परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले, पोलीस उपनिरीक्षक अकबर फारुकी यांच्यासह नवामोंढा किंवा आरसीपी आणि विविध पथके केंद्रस्थळी दाखल झाली होती. शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले.