परभणी : येथील बसस्थानकावर काही वर्षांपूर्वी निर्माण केलेला हिरकणी कक्ष सध्या अडगळीत पडला असून, महिला प्रवाशांची यामुळे कुचंबणा होत आहे़ हिरकणी कक्षाची उभारणी करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़
बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी कक्ष उभारण्याचे धोरण शासनाने आखले होते़ सार्वजनिक ठिकाणी महिलांची कुचंबणा होऊ नये, त्यांना बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा कक्ष उभारण्यात आला़ मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे महिला कक्षांकडे डोळेझाक झाली़ काही वर्षांपूर्वी सुरू झालेले हे कक्ष आता केवळ फलकापुरते शिल्लक राहिले आहे़ परभणी येथील बसस्थानकावर महिलांसाठी उभारण्यात आलेल्या कक्षाला हिरकणी कक्ष असे नामकरण करून हा कक्ष सुरू करण्यात आला़ बसस्थानकातील स्थानकप्रमुखांच्या कक्षाशेजारी हा हिरकणी कक्ष निर्माण केला होता़ मात्र त्या ठिकाणी नियमित स्वच्छता, पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने या कक्षाचा वापर झाला नाही़ कालांतराने या कक्षाला कायमस्वरुपी कुलूप ठोकण्यात आले़
बसस्थानकावर हिरकणी कक्ष कायम बंद असल्याची बाब समोर आल्यानंतर याबाबत ओरडही झाली़ त्यामुळे विभागीय नियंत्रक कार्यालयातील तत्कालीन विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी परभणी बसस्थानकावर सुसज्ज असा हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला़ बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगतच उजव्या बाजूला हा कक्ष सुरू करण्यात आला़ त्यामुळे स्थानकावर येणार्या महिला प्रवाशांची गैरसोय दूर झाली, असे वाटत असतानाच काही महिन्यांतच या ठिकाणचा कक्षही गुंडाळण्यात आला असून, आता त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे़
स्थानकावर अद्ययावत पोलीस चौकी उभारण्याची कार्यवाही स्वागतार्ह असली तरी हिरकणी कक्षासाठी देखील नियोजन करणे अपेक्षित होते़ मात्र महामंडळाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले़ हिरकणी कक्षाकडे प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे़ तेव्हा स्थानकावर हा कक्ष नव्याने सुरू करावा व त्या ठिकाणी वीज, पाणी व आसन व्यवस्था उभारावी, अशी मागणी होत आहे़
शासकीय कार्यालयातही हीच अवस्थापरभणी जिल्ह्याचे मुख्य कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही महिला कक्ष उभारण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याचेच दिसत आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या कक्षासाठी स्वतंत्र जागाही निश्चित केली आहे़ परंतु, या जागेत सैनिकी कल्याण कार्यालय सुरू करण्यता आले़ त्यामुळे महिलांना थांबण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच जागा उपलब्ध नाही़ या कार्यालयात अनेक महिला अधिकारी, कर्मचारी आहेत़ दुपारच्या सुटीच्या वेळी या महिलांची मोठी गैरसोय होते़ या ठिकाणी महिलांचा कक्ष उभारावा, अशी मागणी परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने महिनाभरापूर्वीच केली होती़ परंतु, अद्यापपर्यंत त्यावरही कारवाई झालेली नाही़ अशीच परिस्थिती इतर शासकीय कार्यालयांमध्येही पहावयास मिळत आहे़
तालुक्यांच्या ठिकाणीही दिला फाटापरभणी जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, सेलू, गंगाखेड आणि परभणी असे पाच आगार आहेत़ प्रत्येक आगाराच्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारणे अपेक्षित आहे़ जिल्ह्याच्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या हिरकणी कक्षाचीच अवस्था वाईट झाली आहे़ तालुक्याच्या ठिकाणी तर हे कक्ष उभारण्यातही आले नाहीत़ महिला प्रवाशांकडून अशा कक्षा संदर्भात पाठपुरावा होत नाही़ तसेच कोणी ओरडही करीत नसल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे़ परभणी येथील स्थानिक महामंडळ प्रशासनाने परभणीसह इतर आगारांमध्येही प्राधान्याने हिरकणी कक्ष सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.