देवगावफाटा (परभणी ) : सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु. येथे १९८३ मध्ये मंजुरी मिळून भूमिपूजन झालेल्या हुतात्मा स्मारक उभारणीचे काम ३६ वर्षे उलटले तरी अद्याप या कामाला मुहूर्त लागला नाही. या स्मारक उभारणीच्या कामाबाबत लोकप्रतिनिधीही अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे.
सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु. येथील स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गोविंदराव महानुभव फाटेबुवा यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यामध्ये यशस्वी कामगिरी करीत या भागाचे नेतृत्व केले होते. या काळात रजाकारांच्या हल्ल्यात जीवाजी जवळा परिसरात दत्तात्रय फाटेबुवा यांना हुतात्मे पत्कारावे लागले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्टÑ शासनाने १९८३ साली चिकलठाणा बु. येथे स्वातंत्र्य सैनिक दत्ताबुवा गोविंदराव महानुभव फाटेबुवा या नावाने हुतात्मा स्मारक मंजूर केले. या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा तत्कालीन आ. दगडोबा पाटील पवार झोडगावकर, स्वातंत्र्य सैनिक विनायकराव चारठाणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक दत्ताबुवा फाटेबुवा यांच्या दोन मुली उखाबाई ब्रिजलाल, रुख्मिणबाई ब्रिजलाल यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले; परंतु, पुढे या स्मारकासाठी गावठाणमधील दिलेली २० गुंंठे जमिनीपैकी काही भाग शेत क्षेत्रात येत असल्याच्या कारणाने या जागेबाबत वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले.
त्यानंतर मात्र स्मारक उभारणीच्या कामासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. ३६ वर्षाचा कार्यकाळ उलटला तरीही चिकलढाणा येथे स्मारक उभारणीचे काम होऊ शकले नाही. यामुळे स्वातंत्र्य सैनिक दत्ताबुवा फाटेबुवा महानुभव यांच्या स्मृती जपण्याचा शासनाने घेतलेला निर्णय आजही लाल फितीत अडकला आहे. या स्मारकाबाबतची सद्य स्थिती काय आहे? या बाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासन अनभिज्ञ असल्याचे समोर येत आहे.
माझे पंजोबा स्वा.सै. दत्ताबुवा फाटेबुवा यांना हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मे पत्कारावे लागले. याबद्दल आम्हाला आजही अभिमान आहे; परंतु, ३६ वर्षापासून त्यांच्या नावाने चिकलठाणा बु. येथे मंजूर झालेल्या स्मारकाची उभारणी होऊ शकली नाही. हे दुर्देव आहे. तसेच त्यांच्या पणतूपर्यंत कोणालाही कोणताही शासकीय लाभ मिळाला नाही, हीबाब शासन व लोकप्रतिनिधींना आत्मपरिक्षण करायला लावणार आहे.
-डिगांबर तळेगावकर, पणतू