शहरासह जिल्ह्यात कोरोना कालावधीत व त्यानंतरही अनेकांनी व्यायाम म्हणून किंवा सहज घराच्या परिसरात काही अंतर चालणे सुरू केले होते. मात्र, ही सवय अनलाॅकनंतर अनेकांची मोडली आहे. यात दुचाकी व चारचाकी या वाहनांचा वापर वाढल्याने अनेकांनी पायी चालणे टाळले आहे. परिणामी तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिक व महिलांना कंबरदुखी व गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. यासाठी औषधोपचार करून पुन्हा घरगुती व्यायाम करण्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. याकरिता दररोज पायी चालणे गरजेचे आहे.
या कारणांसाठी होतेय चालणे
ज्येष्ठ नागरिक व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ चालतात.
महिला किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत चालतात.
तरुण वाहन लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली यासह मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत जाण्यासाठी पायी चालतात.
हे करून पाहा
दररोज १ किलोमीटर परिसरापर्यंत जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा.
कुठलेही काम करताना सहकाऱ्यांची मदत कमीत कमी घ्या
घाई नसेल त्यावेळी दुचाकीचा वापर टाळा
म्हणून वाढले हाडांचे आजार
पायी चालणे बंद झाल्याने गुडघ्यामध्ये स्टिफनेस वाढतो. यामुळे हाडे कमकुवत होतात. परिणामी शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. यामुळे वजन वाढते, या सर्वांचा परिणाम हाडे ठिसूळ होण्यावर होतो. यामुळे हाडांचे आजार वाढतात.
ज्यांना पायी चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी...
ज्यांना वयोमानाने किंवा विविध आजारांनी ग्रस्त असल्याने पायी चालता येत नाही अशांनी घरात झोपताना पायाखाली लोड किंवा उशी घेऊन झोपावे. पायाच्या हालचाली (वार्मअप) सकाळी व संध्याकाळी दररोज कराव्यात.
या आजारांचा धोका
पायी न चालल्याने हाडांची ठिसूळता होणे, गुडघा दुखणे, टाचा दुखणे या प्रकारात वाढ होते. स्नायूंना ताण देण्यासाठी पायी चालणे गरजेचे आहे.
दररोज कोमट पाण्याचा वापर सकाळी उठल्यावर करावा, तसेच जास्तीत जास्त कडधान्य व फलाहार घ्यावा. सकाळी ६ ते ८ या कालावधीत शक्य असेल तर फिरायला जावे. यामुळे विविध आजारांपासून होणारा धोका टाळता येऊ शकतो. डॉ. प्रशांत धमगुंडे, आयुर्वेदिक तज्ज्ञ.