परभणी जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय तसेच मनपा स्तरावरील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासह लसीकरणाचे कॅम्प राबविले जात आहेत. काही ठिकाणी ऑन दी स्पॉट रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे तर काहींना ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लसीकरणाचे शेड्यूल उपलब्ध असल्यावर लस दिली जात आहे. या सर्व बाबी शहरी भागात योग्य पद्धतीने राबविल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात लस घेताना अनेकांकडे मोबाईल नसणे तसेच मोबाईल नंबर कोणाचा दिला हे लक्षात न राहणे, नोंदणी न करणे यामुळे लसीकरण होऊनही अनेकांकडे त्याचे प्रमाणपत्र मिळत नाही. परिणामी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेताना लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा नोंदणी नसल्याचा फटका काही जणांना बसला आहे. यामुळे याबाबत प्रत्येकाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण - ३ लाख ६० हजार ८१
पहिला डोस - २ लाख ९० हजार ९४२
दुसरा डोस - ६९ हजार १४१
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास
प्रत्येकाल पहिला डोस ऑनलाईनमध्ये नोंदवावा लागेल, त्यानंतरच दुसरा डोस घेता येईल. लस घेतल्यानंतर नोंदणी झाली का नाही, याची पाहणी प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. लसीकरणाला जाताना शासकीय ओळखपत्र तसेच सुरु असलेला मोबाईल नंबर घेऊन जाणे गरजेचे आहे. आधी नोंदणी केल्यावर मग लस घ्यावी.
लसीकरणावेळी ही घ्या काळजी
लसीकरणासाठी नोंद करताना शक्यतो स्वत:चा मोबाईल नंबर द्यावा, स्वत:कडे नसल्यास अगदी जवळच्या नात्यातील नंबर द्यावा. लसीकरणानंतर लगेच प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. त्याची प्रिंट काढून घ्यावी.
जिल्ह्यात बुधवारपासून लसीकरण मोहिमेच्या वेळी लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर सुरवातीला नोंदणी केल्यावर लगेच ओटीपी पाठविला जात आहे. तो ओटीपी आणि आधार कार्ड तेथे दाखवून पुढील प्रक्रीया पूर्ण केली जाईल. यानंतर लगेच लस दिली जाईल. त्याचा एसएमएस मोबाईलवर प्रत्येकाला प्राप्त होणार आहे. यामुळे ही प्रक्रीया सोपी झाली आहे.
- डाँ. रावजी सोनवणे, जिल्हा माता बालसंगोपण अधिकारी.